घरचे मैदान, उत्साही चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा आणि चांगला फॉर्म काय किमया घडवू शकतात, याचा प्रत्यय उबेर चषकात भारतीय महिला संघाने प्रथमच उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिला. नवी दिल्लीतील सिरी फोर्ट क्रीडा संकुलात सुरू असलेल्या थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आता आपले कांस्यपदक पक्के केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने इंडोनेशियाला ३-० असे पराभूत केले. जवळपास दीड तास चाललेल्या मॅरेथॉन मुकाबल्यात सिंधूने संस्मरणीय विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला जपानशी होणार आहे.
थायलंडविरुद्धच्या सामन्यात जगजेत्या रत्नाचोक इन्थॅनॉनला नमवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सायना नेहवालने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फॅनेन्ट्रीवर २१-१७, २१-१० असा विजय साकारला. पहिल्या गेममध्ये लिंडावेनीने २-० आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत नेत लिंडावेनीने १२-५ अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर सायनाने दमदार स्मॅशच्या बळावर एक गुण कमावला. मात्र यानंतर लिंडावेनीने तडाखेबंद खेळ करत सलग चार गुणांची कमाई केली. भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी असणाऱ्या सायनाने यानंतर मात्र नेटजवळून अचूकतेने खेळ करत सलग चार गुण कमावले. यानंतर एकेक गुणासाठी मुकाबला चुरशीचा झाला. ड्रॉप शॉट आणि स्मॅशच्या फटक्याचा प्रभावीपणे उपयोगी करत सायनाने पिछाडी भरून काढत पहिला गेम नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने ४-० अशी खणखणीत आघाडी घेतली. नेटजवळून शिताफीने खेळ करत सायनाने लिंडावेनीला पिछाडीवर टाकले. यादरम्यान लिंडावेनीच्या हातुन झालेल्या चुकांचा फायदा उठवत सायनाने सातत्याने आघाडी वाढवत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.  
त्यानंतर सिंधूचा थरारक विजय हे भारताच्या यशाचे वैशिष्टय़ ठरले. एक तास आणि २४ मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने बेलाइट्रिक्स मनूपुट्टीवर २१-१६, १०-२१, २५-२३ असा विजय मिळवला. शारीरिक आणि मानसिक कणखरतेची अवघड परीक्षा ठरलेल्या या मुकाबल्यात सिंधूने विजय मिळवत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. पहिल्या गेममध्ये सिंधूने नेहमीच्या शैलीने खेळ केला. प्रदीर्घ रॅली, ताकदवान फटक्यांच्या जोरावर तिने सरशी साधली. मात्र अचानकच दुसऱ्या गेममध्ये तिची कामगिरी खालावली. मनूपुट्टीच्या झंझावाताबरोबरच स्वत:च्या हातून झालेल्या चुकांचा फटका सिंधूला बसला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये प्रत्येक गुणासाठी टक्कर झाली. सिंधूने वारंवार आघाडी घेतली मात्र मनूपुट्टीने चिवटपणे खेळ करत बरोबरी केली. सिंधूला मॅचपॉइंटची संधी होती मात्र मनूपुट्टीने झुंजार खेळ करत बरोबरी साधली. १९-१९, २१-२१, २३-२३ असा सातत्याने सामन्याचे पारडे दोलायमान होत होते. मात्र प्रचंड थकलेली असूनही सिंधूने आपला खेळ उंचावत सरशी साधली. सिंधूच्या विजयामुळे भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळाली.
मग दुहेरीच्या तिसऱ्या लढतीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने ग्रेसिया पोली आणि नित्या क्रिष्णिंडा महेश्वरी जोडीवर २१-१८, २१-१८ असा विजय मिळवला. अचूकतेने आक्रमण करत ज्वाला-अश्विनी जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला वारंवार चकवले. अश्विनीने कलात्मक फटक्यांच्या आधारे खेळ करत ज्वालाच्या आक्रमणाला तोलामोलाची साथ दिली. या विजयासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

माझी सुरुवात चांगली झाली नाही. मात्र त्यानंतर मी माझा खेळ सुधारला. नेटजवळच्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करत मी सरशी साधली.
सायना नेहवाल

या सामन्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. आमच्या दोघींच्याही हातून खूप चुका झाल्या, परंतु अशा दडपणाच्या लढतीत अशा चुका होतात. मी माझा नैसर्गिक खेळ केला आणि संघाला विजयासह आघाडी मिळवून देऊ शकले, याचा आनंद आहे.
पी.व्ही.सिंधू

सायना आणि सिंधूच्या विजयाने आमचा आत्मविश्वास उंचावला. सिंधूच्या मॅरेथॉन लढतीच्या वेळी हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. इंडोनेशियाचे तिसरी एकेरीची आणि दुहेरीची दुसरा संघ मजबूत आहे. त्यामुळे आम्हाला काहीही करून विजय मिळवायचा होता. उपांत्य फेरीत पोहचलो आहोत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. अश्विनीने फटक्यांचा वेग कमी करत शैलीदार खेळ केला आणि त्यामुळे मला आक्रमण करण्यासाठी सुयोग्य संधी मिळाली. एक संघ म्हणून हा विजय संस्मरणीय आहे. या लढतीचा आनंद साजरा करू आणि त्यानंतर उपांत्य फेरीतील जपानच्या आव्हानासाठी तयारी करू.
ज्वाला गट्टा