अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक अजिंक्यपद स्नूकर स्पध्रेची भारताने बाद फेरी गाठली आहे. श्रीलंका व कतारला हरवणाऱ्या भारताने थायलंडकडून ३-२ असा पराभव पत्करला. भारताला ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

थायलंडविरुद्ध लढतीच्या पहिल्या सामन्यात रॅटचायोथिन योथारूकने मनन चंद्राला ६५-३० असे हरवले. मग पंकज अडवाणीने युत्तापॉप पॅकपोजला ७०-३७ असे हरवून बरोबरी साधली. त्यानंतर दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात अडवाणी आणि आदित्य मेहताने योथारूक आणि पॅकपोजचा ९४-१३ असा धुव्वा उडवून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सामन्यात २० वर्षीय योथारूकने धक्कादायक विजयाची नोंद करताना चक्क अडवाणीला ८५-० असे  पराभूत केले. याचप्रमाणे पॅकपोजने चंद्राचा ६२-५४ असा पराभव केला.

त्याआधी, पंकज अडवाणीच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने कतारचा ३-० असा आरामात पराभव केला. अडवाणीने कतारच्या अहमद साईला ७०-१६ असे हरवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मग मनन चंद्राने मोहसिन बुकशैशला ७०-४५ असे पराभूत केले आणि ही आघाडी २-० अशी वाढवली. मग दुहेरीच्या निर्णायक सामन्यात अडवाणी-चंद्रा जोडीने कतारच्या सैफ आणि अली अलोबैदली जोडीला ८८-११ अशी धूळ चारली.