नव्याने सुरुवात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक; आजपासून मालिकेला सुरुवात

भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहजपणे खिशात टाकली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत असून भारताला यावेळी नव्याने सुरुवात करावी लागेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरावा लागेल आणि पाटी कोरी करून पुन्हा एकदा भारताशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना शुक्रवारी झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये रंगणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिकेच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. आपल्या घरच्या मैदानात महेंद्रसिंग धोनी काय चमक दाखवतो, याची चाहते वाट पाहत असतील. या संघात शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि आशीष नेहरा यांचे पुनरागमन झाले आहे. ३८ वर्षीय आशीष नेहराला संघात पुन्हा स्थान दिल्याबद्दल अनेकांनी भुवया उंचावल्या असल्या तरी त्याने २६ सामन्यांमध्ये ३४ बळी मिळवले आहेत. या आकडेवारीनुसार त्याची निवड योग्य असल्याचे समजले जात असले तरी तो मैदानात कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. नेहराला यावेळी युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची साथ मिळू शकेल. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी एकदिवसीय मालिकेत आपली निवड सार्थ ठरवली होती, त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला असेल. धवन रोहितच्या साथीने भारताच्या फलंदाजीचे सारथ्य करेल. बऱ्याच कालावधीनंतर तो भारतीय संघात आल्यावर कशी कामगिरी करतो, हे पाहावे लागेल. हार्दिक पंडय़ाने एकदिवसीय मालिका गाजवली होती. मालिकावीराचा पुरस्कारही त्याने पटकावला होता. त्यामुळे ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये तो आपली कमाल दाखवतो का, याची उत्सुकता असेल.

ऑस्ट्रेलियाच्या संघात काही बदल झाले असले तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल हे धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. फिंच, वॉर्नर आणि स्मिथ यांनी एकदिवसीय मालिकेत बऱ्यापैकी कामगिरी केली होती. पण त्यांना फलंदाजीत सातत्य राखता आले नव्हते. मॅक्सवेलच्या बॅटला गंज चढलाय की काय, असे वाटू लागले आहे. वेगवान गोलंदाज नॅथन कोल्टर-नाइलने एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पण त्याला सुयोग्य साथ मिळाली नव्हती. नॅथनला जर यावेळी दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली तर तो भारताच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोखपणे करू शकतो.

पावसामुळे भारताचा सराव रद्द

पावसामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याचा सराव भारताला रद्द करावा लागला. ‘‘आम्ही येथे दाखल झालो तेव्हापासून पाऊस सुरू झाला. त्यामुळे आम्हाला सराव करता आला नाही, त्याबरोबर रणनीतीही आखता आली नाही. एकदा सराव केला की आम्हाला वातावरण आणि खेळपट्टीचा अंदाज येईल,’’ असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सांगितले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांडय़ा, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन िफच, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा.

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.