झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघाने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.
भारताच्या खात्यावर ११५ गुण जमा असून, अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर १२९ गुण जमा आहेत. दरम्यान, बांगलादेशने नुकता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशा फरकाने विजय संपादन केला आणि मायदेशात सलग चौथा मालिका विजय साजरा केला. त्यामुळे २०१७च्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पध्रेतील त्यांचे स्थान निश्चित झाले आहे. याचप्रमाणे आयसीसी क्रमवारी ते सातव्या स्थानावर आहेत.
एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने चौथे, शिखर धवनने सातवे आणि महेंद्रसिंग धोनीने आपले नववे स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी’व्हिलियर्स या यादीत अव्वल स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या यादीतील अव्वल दहा जणांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. झिम्बाब्वेविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार स्थानांनी आगेकूच करून १२वे स्थान मिळवले केले आहे.