दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : दिवस ३

पुरुषांची बांगलादेश, महिलांची नेपाळवर सरशी साधून विजेतेपदाला गवसणी

मुंबई : काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारात भारताच्या दोन्ही संघांनी सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय पुरुषांनी बांगलादेशला, तर महिलांच्या संघानी यजमान नेपाळला धूळ चारून विजेतेपद मिळवले.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला १६-९ असा एक डाव आणि सात गुणांनी नेस्तनाबूत केले. दीपक माधवने अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने २ मिनिटे, १० सेकंद संरक्षण केले, त्याशिवाय आक्रमणात पाच गडीही बाद केले. राजू बुचानगरी (२.५० मि. आणि २ गडी), अक्षय गणपुले (२.४० मि.) यांनीही संरक्षणात दमदार कामगिरी केली. सुदर्शन आणि अभिनंदन पाटील यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून भारताच्या विजयात बहुमूल्य योगदान दिले. बांगलादेशकडून ईदील खान आणि गंठी यांनी चांगला खेळ केला. उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेला २४-८ अशी एक डाव आणि १६ गुणांनी धूळ चारली होती. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात नेपाळने बांगलादेशला १३-७ असे नमवले.

महिला गटाच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा १७-५ असा एक डाव आणि १२ गुणांनी फडशा पाडला. ऐश्वर्या सावंत (३.४० मि.), प्रियंका भोपी (२.४० मि.), कृष्णा यादव (२.३० मि.) यांनी भारतासाठी संरक्षणात उत्तम खेळ केला. तर आक्रमणात कर्णधार नसरीन आणि काजल भोर यांनी प्रत्येकी पाच खेळाडू बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. नेपाळकडून पूनम थारू आणि अंजली थापा यांनी संघाचा पराभव टाळण्यासाठी कडवा संघर्ष केला. उपांत्य सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेचा ३५-१ असा धुव्वा उडवून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला १०-७ असे नमवले.

कबड्डीत भारतीय महिलांची विजयी सलामी

महिलांच्या कबड्डीत भारतासह यजमान नेपाळने विजयी सलामी दिली. पुरुषांत मात्र माजी विजेत्या पाकिस्तानला श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला. महिलांत चार, तर पुरुषांत पाच संघ असलेल्या या स्पर्धेत दोन्ही गटांत भारतीय संघालाच विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिलांमध्ये भारताने श्रीलंकेचे आव्हान ५३-१४ असे सहज परतवून लावले. सुरुवातपासून आक्रमक खेळ करीत भारताने मध्यंतराला भारताकडे २५-६ अशी मोठी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातदेखील जोशपूर्ण खेळ भारताने ३९ गुणांच्या मोठय़ा फरकाने विजय मिळवला. निशा, पुष्पा यांच्या धुव्वादार चढायांना मिळालेली पायल चौधरी व रितू नेगीची अष्टपैलू साथ यामुळे हे शक्य झाले. महिलांच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळने यजमान बांगलादेशचा ३६-२५ असा पराभव केला. पुरुषांत श्रीलंकेने पाकिस्तान या बलाढय़ संघाला २९-२७ असे चकवत या स्पर्धेत खळबळ उडवून दिली.