भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका

हैदराबादला विराट कोहलीने पाठलाग तंत्र यशस्वी राबवल्याने भारताला विजयी सलामी नोंदवता आली. आता रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीतील दिमाखदार कामगिरी कायम राखतानाच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करून मालिका जिंकण्याचे मनसुबे भारताने आखले आहेत.

गेल्या १३ महिन्यांत भारत वेस्ट इंडिजशी सहा ट्वेन्टी-२० सामने खेळला होता. यापैकी सर्व सामन्यांवर भारताने वर्चस्व मिळवले. शुक्रवारी भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यांत सहा गडी राखून विजय मिळविताना तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. हा भारताचा विंडीजविरुद्धचा सलग सातवा ट्वेन्टी-२० विजय ठरला. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग भारताने या सामन्यात केला. विंडीजचे ५ बाद २०७ हे आव्हान भारताने १८.४ षटकांत पेलले. गेल्या महिन्यात भारताने मायदेशात झालेल्या मालिकेत बांगलादेशलाही २-१ असे नामोहरम केले होते.

विराटसाठी खास रणनीती

वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेतील रंगत टिकवण्यासाठी उत्सुक आहे. परंतु त्यासाठी त्यांना कर्णधार विराट कोहलीला वेसण घालण्याची रणनीती आखावी लागणार आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज केसरिक विल्यम्सने ३.४ षटकांत ६० धावा दिल्या. अनुभवी जेसन होल्डर (०/४६) आणि शेल्डन कॉट्रेल (१/२४) यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये बळी मिळवण्याची आवश्यकता आहे. विंडीजच्या गोलंदाजांनी २३ अतिरिक्त धावा (बाइज ४, लेगबाइज २, नोबॉल ३, वाइड १४) देत भारताच्या विजयाला हातभारच लावला.

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज

एव्हिन लेविस (४०), शिम्रॉन हेटमायर (५६) आणि कर्णधार किरॉन पोलार्ड (३७) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्याच बळावर विंडीजने दोनशे धावसंख्येचा टप्पा ओलांडला. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकांमध्ये चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर महागडा ठरला. त्याने चार षटकांत ५६ देत एकमेव बळी मिळवला. ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारची (३६ धावांत) बळींची पाटी कोरी होती. वॉशिंग्टन सुंदरचाही प्रभाव जाणवला नाही. त्याने गेल्या सहा ट्वेन्टी-२० सामन्यात फक्त दोन बळी मिळवले आहेत. त्यामुळे रविवारच्या सामन्यात मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भारताने क्षेत्ररक्षणातही निराशा केली. सुंदर आणि रोहित शर्माने काही झेल सोडले.

राहुलची सलामीसाठी मजबूत दावेदारी

दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी सलामीला उतरणाऱ्या लोकेश राहुलने भारताच्या विजयाची पायाभरणी करताना ४० चेंडूंत ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रिक्त जागांचे पर्याय हाताळणाऱ्या भारतीय संघाच्या सलामीच्या पर्यायासाठी दावेदारी त्याने मजबूत केली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा वेगाने गाठणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. राहुलने २९व्या सामन्यांत अर्धशतक नोंदवताना हे यश मिळवले आहे. त्यानंतर विराट कोहलीने नाबाद ९४ धावांची कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी उभारत भारताचा विजय निश्चित केला. फलंदाजीत सातत्याचा अभाव आणि खराब यष्टीरक्षणामुळे टीकेच्या लक्ष्यस्थानी असलेल्या ऋषभ पंतने (१८) चौथ्या स्थानावर उतरून दोन उत्तुंग षटकार खेचले. परंतु खेळपट्टीवर टिकून मोठी धावसंख्या तो उभारू शकला नाही.

गोलंदाजांच्या अपयशामुळे आम्ही पराभूत -पोलार्ड

हैदराबाद : भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. परंतु गोलंदाज मात्र आखलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला, अशी खंत वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने व्यक्त केली.

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना दिलेले २०८ धावांचे लक्ष्य भारताने चार फलंदाजांच्या मोबदल्यात आठ चेंडू राखूनच पार केले. ‘‘माझ्या मते आमच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. ट्वेन्टी-२० सामन्यात कोणत्याही संघाविरुद्ध २०० धावांहून अधिक धावा करणे आव्हानात्मकच असते. मात्र गोलंदाजांनी फलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले,’’ असे सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पोलार्ड म्हणाला.

‘‘आम्ही एकूण २३ अवांतर धावा दिल्या. भारतासारख्या संघाविरुद्ध तुम्ही अशी चूक केल्यास, याचा फटका निश्चितच भोगावा लागतो. त्यामुळेच गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात कामगिरीत सुधारणा करणे नितांत गरजेचे आहे,’’ असे पोलार्डने सांगितले.

संधीचा लाभ घेण्याचेच माझे ध्येय – राहुल

हैदराबाद :शिखर धवनच्या अनुपस्थितीत मला सलामीला संधी देण्यात आली असून या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यावरच मी लक्ष केंद्रित करत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा प्रभारी सलामीवीर लोकेश राहुलने व्यक्त केली.

राहुलने केलेल्या ६२ धावांनी भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी अद्याप भरपूर कालावधी शिल्लक आहे. मात्र मी तुर्तास पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करत असून संघातील स्थान पक्के करण्यावर माझा भर आहे,’’ असे राहुल म्हणाला.

‘‘धवनच्या अनुपस्थितीत मला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या क्रमांकावर सातत्याने धावा करण्यासाठी मी उत्सुक आहे. त्याशिवाय धवन परतल्यानंतर संघ व्यवस्थापन मला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्याचा विचार करत असेल, तर ती भूमिका बजावण्यासाठीही मी सज्ज आहे,’’ असेही २७ वर्षीय राहुलने सांगितले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, खॅरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.

*  सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १