ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मालिका विजयाची पुनरावृत्ती; पंत, गिल, पुजारामुळे चौथी कसोटी जिंकली

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने त्यानंतर फिनिक्सभरारी घेत प्रतिष्ठेचा बॉर्डर-गावस्कर चषक पुन्हा आपल्याकडे राखला. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत तीन गडी राखून झुंजार विजय मिळवला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-१ असा कब्जा केला.

सामन्याच्या पाचव्या दिवशी वरुणराजाने विश्रांती घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य ऋषभ पंतच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीमुळे भारताला गाठता आले. त्यामुळे ब्रिस्बेनचा ३२ वर्षे अबाधित राहिलेला गड भारताने सर केला. भारताविरुद्धच्या सलग दोन कसोटी मालिका मायदेशात गमावल्यामुळे टिम पेनचे कर्णधारपद खालसा होण्याची शक्यता आहे.

पंतने पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदरच्या (२२) साथीने शंभराव्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या नॅथन लायनवर जोरदार हल्ला केला. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानल्या जाणाऱ्या पॅट कमिन्सला त्याने हुकचा फटका खेळत प्रेक्षणीय षटकार खेचला. परदेशातील भारताच्या संस्मरणीय विजयाची नोंद करताना पंतने कट, पॅडल-स्वीप्ट असे भात्यातील अप्रतिम फटक्यांची नजाकत पेश केली.

शुभमन गिलने (१४६ चेंडूंत ९१ धावा) भारताच्या विजयाचा दिमाखदार पाया रचला. चेतेश्वर पुजाराने (२११ चेंडूंत ५६ धावा) कसोटी क्रिकेटमधील धिमे अर्धशतक साकारून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झगडायला लावले. त्यानंतर पंतने विजयाचा कळस चढवला.

२०००नंतरच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा हा विजय अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने साकारला. या कसोटी मालिकेत विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रित बुमरा यांच्यासारखे मातब्बर खेळाडू पूर्णत: उपलब्ध नसतानाही भारताने ही किमया साधली. २०१८-१९मध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २-१ असा विजय मिळवला होता. या वेळी स्मिथ-वॉर्नर असतानाही भारताने असंख्य नवोदित खेळाडू आणि दुखापतींचे आव्हान पेलत हा मालिकाविजयाचा अध्याय लिहिला.

अ‍ॅडलेडच्या मानहानीकारक पराभवानंतर रहाणेने मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटीत भारताला विजयाचा मार्ग दाखवला. त्यानंतर सिडनीत अश्विन आणि हनुमा विहारी जोडीने तिसरी कसोटी अनिर्णीत राखली. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी हा सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता होती. परंतु गिल आणि पंत यांना हे मंजूर नव्हते.

गिलने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉइंट आणि डीप मिड-विकेट असे दोन षटकार खेचले, तर पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा आत्मविश्वासाने सामना केला. पुजाराच्या हेल्मेटवर, छातीवरही चेंडू लागले, परंतु तो डगमगला नाही. गिल आणि पुजारा यांनी ११४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. उत्तरार्धात वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरला बाद करून ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु पंतने मिड-ऑफला चौकार खेचत भारताच्या विजजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने १३८ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८९ धावांची खेळी करीत सामनावीर किताब जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पंतने धोनीला मागे टाकले

पंतने भारताचा विजयाध्याय लिहितानाच मंगळवारी महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकले. यष्टीरक्षक-फलंदाज धोनीने ३२ डावांत एक हजार धावांचा टप्पा गाठला होता. पंतने फक्त २७ डावांत ४०.०४च्या सरासरीने एक हजार धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (२१ डाव) या यादीत आघाडीवर आहे.

माझ्या कारकीर्दीतील हा सर्वाधिक अविस्मरणीय क्षण आहे. अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळालेले नसतानाही सहकाऱ्यांसह संघ व्यवस्थापनाने माझी पाठराखण केली. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मी ही खेळी साकारू शकलो. भारतासाठी सामने जिंकावेत, असे स्वप्न मी दररोज पाहत असतो आणि आज मी ते अखेर करूनही दाखवले.

ऋषभ पंत, सामनावीर