ग्लासगो येथे सुरू असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरूष हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीतील विजयामुळे हॉकीमध्ये भारताचे पदक निश्चित झाले आहे. भारताने उपांत्य फेरीत न्युझीलंडच्या संघाचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या न्युझीलंड संघामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा होता. सामन्याच्या सुरूवातीला सायमन चाईल्ड आणि निक हेग यांनी गोल करत न्युझीलंडला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यामुळे खचून न जाता भारतीय संघाच्या आकाशदीप सिंग, रमदनदीप सिंग आणि रुपिंदर पाल यांनी प्रत्येकी एक गोल करत अंतिम फेरीत भारताचे स्थान निश्चित केले.  अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियन संघाच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे . त्यामुळे ऑस्ट्रेलियावर मात करून भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकावर नाव कोरणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिली आहे.