भारतीय क्रिकेटची सध्याची अवस्था पाहून मला निराशा वाटते. ट्वेन्टी-२०च्या पलीकडेही क्रिकेट आहे, ही गोष्ट त्यांनी ध्यानात घेतली पाहिजे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहायला मला नेहमीच आवडायचे. मात्र, आता काय बोलावे हे मला कळेनासे झाले आहे, असे इंग्लंडचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू इयान बॉथम यांनी सांगितले . ते लॉरेन्स क्रीडा पुरस्कार सोहळ्याच्यावेळी बोलत होते. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी इयान बॉथम यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधणे टाळले.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना त्यांनी भारत-इंग्लंड यांच्यात काही वर्षांत झालेल्या कसोटी मालिकेचा आधार घेतला. इंग्लंड दौऱ्यात भारताने ०-४आणि १-३ अशा फरकाने मालिका गमावली, तसेच २०१२ मध्ये मायदेशातही भारताला मालिका गमवावी लागली होती. हाच धागा पकडत बॉथम यांनी कसोटी क्रिकेटमधील भारताच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्याबाबत हे का घडत आहे, हा सातत्याने ट्वेन्टी-२० खेळण्याचा परिणाम आहे?, यातून त्यांनाच मार्ग काढायचा आहे, अशा शब्दांत बॉथम यांनी भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या परिस्थितीविषयी नाराजी व्यक्त केली.
कसोटी क्रमवारीत भारत सध्या तिसऱ्या स्थानी आहे. तरीही बॉथम यांना भारताच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीविषयी संभ्रम आहे. माझा मानांकनावर विश्‍वास नाही. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने कसोटी क्रिकेटमधील आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे, असे सांगताना त्यांनी भारताविषयी मात्र नाराजी व्यक्त केली. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंडचा संघ भारतात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास येणार आहे.