‘‘भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव स्वीकारला असला तरीही त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. पुढच्या विश्वचषकापर्यंत हाच संघ कायम ठेवावा,’’ असे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी सांगितले.

संघाच्या कामगिरीबाबत समाधान प्रकट करताना गायकवाड म्हणाले, ‘‘कसोटी आणि तिरंगी स्पध्रेत भारताची कामगिरी खूपच निराशाजनक झाली होती. या पाश्र्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. उपांत्य फेरीत आपल्याला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी आपण त्यांना चांगली लढत दिली आहे. जर हाच संघ पुढच्या विश्वचषकापर्यंत कायम राहिला तर त्या स्पर्धेत ते विश्वचषक घेऊन येतील अशी मला खात्री आहे.’’
‘‘उपांत्य फेरीतील पराभवास मधल्या फळीतील फलंदाज जबाबदार आहेत. आपल्या गोलंदाजांनी या स्पर्धेत सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरी केली. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीनेच संघाचे नेतृत्व करावे,’’ असेही गायकवाड यांनी सांगितले.