तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या युवा संघाने (१९ वर्षांखालील) भारताच्या युवा संघाचा पाच गडी राखून पराभव केला. युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) १७ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. त्याच्या तयारीसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका भारत खेळला. तिसरी लढत गमावली असली तरी पहिल्या दोन लढती जिंकून भारताने ही सरावाची मालिका २-१ या फरकाने जिंकली.

तिसऱ्या लढतीत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. कर्णधार प्रियम गर्गच्या ५२ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ८ बाद १९२ धावा केल्या. मात्र हे आव्हान यजमान दक्षिण आफ्रिकेने पाच विकेटच्या बदल्यात पार केले. जोनाथन बर्डने नाबाद ८८ धावांची फटकेबाजी करत भारताला पराभव पत्करायला लावले.

युवा विश्वचषकापूर्वी भारत आता चौरंगी सराव लढतींच्या मालिकेत खेळेल. त्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेसह झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका  : ५ बाद १९३ (जोनाथन बर्ड नाबाद ८८; यशस्वी जयस्वाल २/४०) विजयी वि. भारत  : ८ बाद १९२ (प्रियम गर्ग ५२; फेकू मॉलेटसेन २/३६).