भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेनंतर यापुढे खेळायचे की नाही, हा विचार मी करणार आहे, असे स्पष्ट मत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने व्यक्त केले आहे.

चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात मलिंगाने भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करत तीनशे बळी पूर्ण केले. पण श्रीलंकेला या सामन्यात १६८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

‘‘पायाला झालेल्या दुखापतीनंतर तब्बल १९ महिन्यांनी मी संघात पुनरागमन केले. झिम्बाब्वे आणि भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये माझ्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली आहे. आता यापुढे शरीर किती साथ देईल आणि किती वर्षे खेळायचे, याचा निर्णय मी भारताविरुद्धच्या मालिकेनंतर घेणार आहे,’’ असे मलिंगाने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, ‘‘माझ्याकडे किती अनुभव आहे, ही गोष्ट महत्त्वाची नाही. जर मी संघाला सामना जिंकवून देऊ शकत नसेल आणि संघाला अपेक्षित असलेली कामगिरी माझ्याकडून होत नसेल तर यापुढे क्रिकेट खेळण्यात काहीच हशील नाही.’’

चौथ्या सामन्यातील भारताच्या फलंदाजीबद्दल मलिंगा म्हणाला की, ‘‘ विराट आणि रोहित यांनी दमदार फलंदाजी केली. त्यांच्यापुढे सातत्याने भेदक मारा करणे आम्हाला जमले नाही.’’