भारत-श्रीलंका यांच्यातील महत्त्वाच्या एसएससी (सिंहलीज स्पोर्ट्स क्लब) परीक्षेच्या पहिल्या दिवशी पावसानेच धिंगाणा घातल्याने बराचसा खेळ वाया गेला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत भारताची पहिल्या दिवसाच्या खेळात २ बाद ५० अशी अवस्था झाली होती.
एसएससी स्टेडियमवर सकाळी तासाभराचा खेळ झाल्यानंतर पावसाने बरसात केली. पाहुण्या संघाला जेमतेम १५ षटके खेळता आली. उपाहारानंतर मात्र वरुणराजाने आपले वर्चस्व दाखवून दिल्याने खेळ होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले. वातावरणाच्या निरीक्षणानंतर खेळ होणार नसल्याचे पंचांनी जाहीर केले, तेव्हा चेतेश्वर पुजारा (१९) आणि कर्णधार विराट कोहली (१४ ) खेळत होते. पहिल्या दिवशी पावसाने नुकसान झालेला खेळ भरून काढण्यासाठी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्यास सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.१५ वाजपर्यंत खेळ चालेल.
त्याआधी़, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यजमान श्रीलंकेने संघात तीन बदल केले. निवृत्त फलंदाज कुमार संगकाराच्या जागी अपेक्षेप्रमाणेच उपुल थरंगाला संघात स्थान मिळाले. तंदुरुस्त न्यूवान प्रदीप हा दुष्मंता चमिराच्या जागी संघात परतला. जेहान मुबारकला वगळण्यात आले, तर कुशल परेराला पदार्पणाची संधी मिळाली.
भारतानेही अंतिम ११ जणांची निवड करताना दोन बदल केले. दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी पुजारा संघात आला, तर मांडीचा स्नायू दुखावलेल्या वृद्धिमान साहाऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी नमन ओझाकडे सोपवण्यात आली.
पुजाराने लोकेश राहुलच्या साथीने भारताच्या डावाला प्रारंभ केला, परंतु ही जोडी फार टिकली नाही. धम्मिका प्रसादच्या (१/१६) इनस्विंगरने लोकेशचा घात केला आणि फक्त २ धावांवर तो माघारी परतला. या कसोटीसह मागील सहा सामन्यांत भारताने पाच सलामीच्या जोडय़ा वापरल्या आहेत.
मग तिसऱ्या फलंदाजीला उतरलेल्या अजिंक्य रहाणेने दोन अप्रतिम ड्राइव्हचे फटके सादर केले. परंतु तो खेळपट्टीवर फार काळ तग धरू शकला नाही. मध्यमगती गोलंदाज न्यूवान प्रदीपने (१/१६) डावाच्या चौथ्या षटकात ल्याला पायचीत केले.
दुसऱ्या कसोटीतील दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यामुळे भारताची २ बाद १४ अशी अवस्था झाली. मग कोहलीने पुजाराच्या साथीने जिद्दीने किल्ला लढवला. आठव्या षटकात प्रदीपच्या गोलंदाजीवर दिनेश चंडिमलच्या जागी यष्टीरक्षण करणाऱ्या परेराने त्याला जीवदान दिले. त्या वेळी कोहली फक्त आठ धावांवर होता. परेराच्या हातून निसटलेला चेंडू यष्टीपाठीमागे हेल्मेटवर आदळला आणि भारताच्या खात्यावर ५ दंडात्मक धावांची भर पडली.
धावफलक
भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल त्रि. गो. प्रसाद २, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १९, अजिंक्य रहाणे पायचीत गो. प्रदीप ८, विराट कोहली खेळत आहे १४, अवांतर (वाइड १, नोबॉल १, दंड ५) ७, एकूण १५ षटकांत २ बाद ५०
बाद क्रम : १-२, २-१४
गोलंदाजी : धम्मिका प्रसाद ४-०-१६-१, न्यूवान प्रदीप ६-०-१६-१, अँजेलो मॅथ्यूज ४-२-७-०, रंगना हेराथ १-०-६-०.