दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अपेक्षेप्रमाणेच महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आलेली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील विजयी संघात फक्त एकमेव बदल करताना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ाचे पुनरागमन झाले आहे.

दोन महिन्यांची विश्रांती घेणारा धोनी सध्या अमेरिकेत कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेला आहे. याआधी त्याने १५ दिवस सैन्यात घालवले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसंदर्भात धोनीच्या उपलब्धतेबाबत निवड समितीने चर्चा केली का, हे मात्र समजू शकले नाही. दुखापतीतून सावरलेला हार्दिक भारतीय संघात परतला आहे, तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला खेळाचा ताण व्यवस्थापन कार्यक्रमानुसार संघात स्थान देण्यात आलेले नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने ३-० असे निभ्रेळ यश मिळवले आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

असे आहे भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिके विरूद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन टी २० मालिकेची सुरूवात 15  सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे त्यानंतर मोहाली 18 सप्टेंबर ला  आणि बेंगळुरू येथे २२ सप्टेंबर रोजी शेवटचा सामना होणार आहे त्यानंतर 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.