पीटीआय, टोक्यो

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमधील अनपेक्षित रीतेपणानंतर भारतीय नेमबाज शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘लक्ष्यभेद’ मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या १५ही नेमबाजांकडे पदक जिंकण्याची क्षमता आहे. परंतु यापैकी काही जण नक्की पदकाची स्वप्नपूर्ती साकारतील अशी अपेक्षा आहे.

पहिल्यावहिल्या महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील पात्रता फेरीत अपूर्वी चंडेला आणि एलवेनिल वैलेरिवन आपले कौशल्य आजमावतील. मग १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सर्वाधिक अपेक्षा असलेला सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचा पात्रता फेरीत कस लागणार आहे.

तीन ‘आयएसएसएफ’ विश्वचषक सुवर्णपदके खात्यावर असलेली अपूर्वी करोनातून सावरत ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. हे अपूर्वीचे कारकीर्दीतील दुसरे ऑलिम्पिक आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेली २१ वर्षीय एलवेनिल गेली सात वष्रे ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंगकडे मार्गदर्शन घेत आहे. १९ वर्षीय सौरभने गेल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीतील विश्वचषक स्पर्धामध्ये आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्यपदके कमावली आहेत. त्यामुळेच त्याच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत.

पुरुषांचे न्यूझीलंडविरुद्ध पारडे जड; महिलांपुढे नेदरलँड्सचे कडवे आव्हान

सोनेरी भूतकाळाची पुनरावृत्ती करण्याच्या ईष्र्येने ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला भारतीय पुरुष हॉकी संघ शनिवारी न्यूझीलंडशी सामना करणार आहे. या सामन्याद्वारे विजयारंभाची संधी पुरुष संघापुढे असेल. महिला संघापुढे नेदरलँड्सचे कडवे आव्हान असेल. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके खात्यावर असलेल्या भारतीय पुरुष संघाने १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्णपदक मिळवले होते. सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाकडून पदकाच्या अपेक्षा केल्या जात आहेत. भारताचा समावेश असलेल्या अ-गटात गतऑलिम्पिक विजेता अर्जेटिना, बलाढय़ ऑस्ट्रेलिया, यजमान जपान, न्यूझीलंड आणि स्पेन या संघांची आव्हाने असतील.

विकासपुढे खडतर आव्हान

पहिल्या दिवशी रायोगोकू कोकूगिकान एरिनावर विकास कृष्णन (६९ किलो) हा भारताचा एकमेव बॉक्सिंगपटू आपल्या मोहिमेला प्रारंभ करील. शनिवारी विकासची जपानच्या सेवॉनरेट्स क्विन्सी मेनसाह ओकाझावाशी गाठ पडणार आहे. त्यामुळे २९ वर्षीय विकासची पदकाची वाट बिकट मानली जात आहे. हरयाणाच्या विकासने पहिली फेरी ओलांडल्यास त्याच्यापुढे क्युबाच्या तिसऱ्या मानांकित रोनील इग्लेसियासचे उपउपांत्यपूर्व फेरीत आव्हान असेल.

मनिका बत्रावर भिस्त

आशियाई क्रीडा स्पध्रेत भारतीय टेबल टेनिसपटूंनी अनपेक्षित कामगिरी केली होती. ऑलिम्पिकमध्येही त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सक आहेत. शनिवारी भारताची भिस्त मनिका बत्राच्या कामगिरीवर असेल. मिश्र दुहेरीत मनिका आणि शरथ कमाल जोडीची चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरील लिन यून-जू आणि शेंग आय-शिंग जोडीशी गाठ पडणार आहे. याशिवाय महिला एकेरीत मनिका आणि सुतिर्था मुखर्जी यांचे सलामीचे सामने होतील. मनिका ब्रिटनच्या टिन-टिन हो हिच्याशी सामना करील, तर जागतिक क्रमवारीत ९८व्या स्थानावरील सुतिर्था स्वीडनच्या लिंडा बेर्गस्ट्रोमशी सामना करील.

सानिया-अंकिता जोडीपुढे पहिला अडथळा

अनुभवी सानिया मिर्झा आणि पदार्पणवीर अंकिता रैना यांनी चमत्कारिक कामगिरी दाखवली तरच भारताला टेनिसमध्ये पदकाकडे अपेक्षेने पाहता येईल. सानिया-अंकिता जोडीपुढे युक्रेनच्या नाडिया आणि लायुडमायला  किचेनॉक भगिनींच्या पहिल्या अडथळ्याला सामोरे जावे लागेल. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत १४४व्या क्रमांकावर असलेल्या सुमित नागलला आव्हानात्मक कार्यक्रमपत्रिका लाभली आहे. त्याची सलामी आशियाई विजेत्या डेनिस इस्टोमिनशी होणार आहे.

मिराबाईच्या अध्यायाला प्रारंभ

रिओ ऑलिम्पिकमधील अपयश मागे टाकून वेटलिफ्टिंगमध्ये पदकाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी माजी विश्विजेती मिराबाई चानू उत्सुक आहे. वैयक्तिक सर्वोत्तम २०५ किलो वजन उचलण्याची कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या ४९ किलो वजनी गटातील मिराबाईकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत. चीनची होऊ झिहुईचे कडवे आव्हान मिराबाईपुढे असेल.

साईप्रणितची आज सलामी

पहिल्या दिवशी बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत बी. साईप्रणित तसेच पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी शनिवारी सलामीची लढत खेळतील. साईप्रणितचा पहिला सामना इस्रायलच्या मिशा झिल्बेरमनशी रंगणार आहे. भारताच्या १३व्या मानांकित चिरागला ‘ड’ गटात अव्वल ठरण्यासाठी नेदरलँड्सच्या जागतिक क्रमवारीत २९व्या क्रमांकावरील मार्क कॅयजोऊला हरवावे लागेल. परंतु चिराग-सात्त्विक जोडीला मात्र अवघड कार्यक्रमपत्रिका मिळाली आहे. जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावरील या जोडीला शनिवारी चायनिज तैपेईच्या तिसऱ्या क्रमांकावरील ली यांग आणि वांग चि लिन जोडीचा सामना करावा लागेल.

आजचे वेळापत्रक

६ हॉकी

पुरुष : भारत वि. न्यूझीलंड

वेळ : सकाळी ६.३० वा.

महिला : भारत वि. नेदरलँड्स

वेळ : सायंकाळी ५ वा.

६नेमबाजी

महिला एकेरी : अपूर्वी चंडेला, एलवेनिल वैलेरिवन

वेळ : सकाळी ५ वा.

पुरुष एकेरी : सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा;  वेळ : सकाळी ९.३० वा.

६बॅडमिंटन

पुरुष एकेरी : बी. साईप्रणित

वेळ : सकाळी ९.३० वा.

पुरुष दुहेरी : चिराग शेट्टी-सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी

वेळ : सकाळी ८.५० वा.

तिरंदाजी

मिश्र दुहेरी : दीपिका कुमारी-प्रवीण जाधव; वेळ : सकाळी ६ वा.

बॉक्सिंग

पुरुष : विकास कृष्णन

वेळ : दुपारी ४ वा.

६टेबल टेनिस

मिश्र दुहेरी : शरथ कमल-मनिका बत्रा

वेळ : सकाळी ८.३० वा.

महिला एकेरी : मनिका बत्रा, सुतिर्था मुखर्जी; वेळ : दुपारी १२.१५ वा.

टेनिस

पुरुष एकेरी : सुमित नागल

वेळ : सकाळी ७.३० वा.

ज्युदो

महिला : सुशिला देवी लिक्माबाम

वेळ : सकाळी ८.३० वा.

वेटलिफ्टिंग

महिला : मीराबाई चानू

वेळ : सकाळी १०.२० वा.

नौकानयन

पुरुष दुहेरी : अर्जुन लाल-अरविंद सिंग; वेळ : सकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण

सोनी टेन २, ३ (हिंदी), सोनी सिक्स आणि संबंधित एचडी वाहिन्यांवर