युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम रंगात आलेला असताना बीसीसीआयने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. सुनिल जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने टी-२०, वन-डे आणि कसोटी अशा तिन्ही संघात रोहित शर्माला स्थान दिलं नाही. आयपीएलदरम्यान रोहित शर्माला झालेली दुखापत लक्षात घेऊन निवड समितीने हा निर्णय घेतला, वैद्यकीय पथक रोहित आणि इशांतच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून असेल असं बीसीसीआयनेही जाहीर केलं. साहजिकत रोहितसारख्या खेळाडूला संघात स्थान न मिळाल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच दिवशी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करताना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेबद्दलचा संभ्रम आणखीन वाढला. परंतू रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळण्यामागचं खरं कारण आता पुढे आलं आहे.

अवश्य वाचा – Fact Check : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळाल्यानंतर रोहितने ट्विटर Bio बदलला?? काय आहे सत्य…

संघ निवडीच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल असा अहवाल निवड समितीला दिला. या अहवालात नितीन पटेल यांनी विशेष तळटीप नमूद केली ज्यात मेडीकल टीम रोहितच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. ज्यावरुन निवड समितीने रोहितचा संघात समावेश केला नाही. मात्र संघाची निवड झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यामुळे निवड समितीलाही आश्चर्य वाटलं. फिजीओंनी दिलेल्या अहवालावरुन निवड समितीने रोहितची संघात निवड केली नाही. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अवश्य वाचा – रोहितच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम!

रोहितच्या दुखापतीबद्दल नितीन पटेल यांनी दोन तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली होती. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितला किमान दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सुनिल जोशी यांच्या निवड समितीने नितीन पटेल यांच्या अहवालावरुन रोहितला संघात स्थान दिलं नाही. “प्रत्येक दौऱ्याआधी संघाचे फिजीओ खेळाडूंच्या फिटनेसविषयी अहवाल निवड समितीला देतात. या अहवालात रोहितला विश्रांतीची गरज असल्याचं मत पटेल यांनी व्यक्त केलं होतं आणि तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल असं सांगितलं. यासाठी त्यांनी दोन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लाही घेतला.” BCCI मधील सूत्रांनी माहिती दिली.

१८ ऑक्टोबररोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात खेळत असताना रोहितला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली असली तरीही निवड समिती रोहित शर्मा या दुखापतीमधून सावरेल याबद्दल आशादायी आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी रोहित शर्मा फिट झाल्यास तो भारतीय संघात खेळू शकतो. त्यामुळे पुढचे काही दिवस डॉक्टर रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार असून येत्या काही दिवसांत त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान मिळेल की नाही याचा निर्णय घेतला जाईल.