भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका

आत्मविश्वास उंचावलेल्या आणि आधीच मालिका खिशात टाकणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून निर्भेळ यशाचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलिया संघ मात्र लागोपाठच्या दोन पराभवांतून सावरला नसून त्यांना दुखापतींची चिंता सतावत आहे.

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जोमाने पुनरागमन केले आहे. तिसरा एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने जिंकून भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातील विजयाचा शिल्पकार रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीचा कोणताही फरक भारतीय संघाच्या कामगिरीवर पडला नाही. भारताने दुसरा सामना सहा गडी राखून जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. हार्दिक पंडय़ा आणि टी. नटराजन यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीतही नटराजन, दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांच्या मदतीने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. नटराजनच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चाचपडताना दिसत आहेत. पहिल्या सामन्यातील नटराजनची कामगिरी भारताच्या विजयात मोलाची ठरली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात धवन, पंडय़ा आणि कोहलीची फटकेबाजी महत्त्वपूर्ण ठरली. सिडनी क्रिकेट मैदानावर धावांचा पाऊस पडत असून मंगळवारीही फलंदाजांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

२ तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला दोनदाच (भारत आणि पाकिस्तान) ०-३ अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

२ भारताने तिसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकल्यास, जागतिक क्रमवारीत ते ऑस्ट्रेलियाला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर कूच करतील.

११ ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्भेळ यश मिळवून भारताला अफगाणिस्तानच्या सलग ११ सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी आहे.

श्रेयसचा समावेश फलदायी

जायबंदी मनीष पांडेच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिल्याचा फायदा भारताला दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात झाला. अखेरच्या क्षणी श्रेयसने पंडय़ाला मोलाची साथ देत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली. मात्र मनीष तिसऱ्या लढतीसाठी तंदुरुस्त असल्यास श्रेयस अथवा राहुलला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच मयांक अगरवालही संधीच्या प्रतीक्षेत आहे. त्याशिवाय दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू यजुर्वेद्र चहल अपयशी ठरला असला तरी गोलंदाजीत सहावा पर्याय नसल्यामुळे त्याला चार षटके टाकावी लागली. बुमरा-शमी यांना कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर विश्रांती देण्यात आली असून जडेजाने या मालिकेतून माघार घेतल्यामुळे गोलंदाजांच्या फळीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.

स्मिथला विश्रांती?

कसोटी मालिकेसाठी सज्ज होण्याकरिता अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथला विश्रांती देण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केला आहे. तसे झाल्यास, मार्कस स्टॉइनिस आणि अ‍ॅलेक्स कॅरी यांना संधी मिळणार आहे. कर्णधार फिंच दुखापतीनंतर पुनरागमन करणार असल्याचे लँगर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या सामन्याला फिंच मुकल्यास, शॉर्ट सलामीलाच फलंदाजीसाठी उतरणार आहे.

मातब्बरांच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियाला फटका

कर्णधार आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या अव्वल खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाला आपल्याच देशात ट्वेन्टी-२० मालिका गमवावी लागली. डार्सी शॉर्ट पहिल्या दोन सामन्यांत सलामीवीर म्हणून अपयशी ठरला. त्यामुळे मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल या अनुभवी खेळाडूंपैकी एकाला मोठी खेळी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. गोलंदाजांचा कमी अनुभव भारताच्या पथ्यावर पडत आहे.

जायबंदी जडेजा पहिल्या कसोटीला मुकणार?

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता बळावली आहे. ३२ वर्षीय जडेजाला ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात स्नायूंच्या दुखापतीचा त्रास जाणवला. त्याशिवाय डोक्यावर चेंडू लागल्यामुळेही तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नाही. जडेजाला या दोन्ही दुखापतींतून सावरण्यासाठी तीन आठवडय़ांचा अवधी लागू शकतो. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी १७ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे सुरू होणार आहे. ‘‘कन्कशनसंबंधी ‘आयसीसी’च्या नियमावलीनुसार एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यास त्याला किमान ८ ते १० दिवस विश्रांती आवश्यक आहे. त्यामुळे साहजिकच जडेजा तिसरा ट्वेन्टी-२० सामना तसेच कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सराव सामन्यांना मुकणार आहे. परंतु त्याची स्नायूंची दुखापत अधिक गंभीर ठरण्याची भीती असल्याने पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघातील त्याच्या समावेशाची शक्यता कमीच आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन आणि शार्दूल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), सीन अबॉट, मिचेल स्वेपसन, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन लायन, जोश हेझलवूड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅडम झम्पा, अँड्रय़ू टाय, डार्सी शॉर्ट.

* सामन्याची वेळ : दुपारी १.४० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३