भारताने चौथ्या साखळी सामन्यात दक्षिण कोरियाचा ६-१ असा धुव्वा उडवत २१ वर्षांखालील सुल्तान जोहोर बाहरू हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारताने सहा देशांच्या या स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली.
तमान दाया स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारताने दोन्ही सत्रात प्रत्येकी तीन गोल केले. भारताकडून अमित रोहिदास (सातव्या मिनिटाला), सतबीर सिंग (नवव्या मिनिटाला), तलविंदर सिंग (३१व्या मिनिटाला), अमन मिराश तिर्की (५७व्या मिनिटाला), रमणदीप सिंग (६२व्या मिनिटाला) आणि अफान युसूफ (६५व्या मिनिटाला) यांनी गोल केले. कोरियाकडून योऊ सेऊंग जू याने ३४व्या मिनिटाला एकमेव गोल झळकावला. भारताचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. याआधीच्या सामन्यात भारताने इंग्लंड (२-१), अर्जेटिना (३-२) आणि पाकिस्तानवर (४-०) मात केली होती.
कोरियाविरुद्धच्या या सामन्यावर भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजविले. सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत रोहिदासने भारतासाठी पहिला गोल केला. दोन मिनिटानंतर भारताने सतबीरच्या गोलाच्या जोरावर आपली आघाडी मजबूत केली. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यात तीन मिनिटे शिल्लक असताना तलविंदरने भारतासाठी तिसरा गोल लगावला. कोरियाने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भारताने कामगिरी उंचावत दुसऱ्या सत्रात तीन मैदानी गोलांची भर घातली.

भारताच्या खेळाडूंनी सुरेख खेळ केला. डावपेचांची अचूक सांगड बांधत भारताने गोल केले. गेल्या दोन सामन्यांत भारताच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. ही भारतासाठी चांगली बाब आहे. आता या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याकडे आमचे लक्ष लागले आहे.
– ग्रेग क्लार्क, भारताचे प्रशिक्षक