आशियाई चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत स्थान

जेजे लालपेखुलाच्या दोन गोलच्या बळावर भारताने आशियाई चषक पात्रतेच्या प्ले-ऑफ लढतीत लाओसचा ६-१ असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह भारतीय संघाने २०१९च्या आशियाई चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत स्थान पक्के केले.

१६व्या मिनिटाला लाओसच्या खोनसाव्हा शिहाव्होंगने गोल केला. हा  क्षण सोडला तर भारताने या सामन्यात दणदणीत वर्चस्व गाजवले. जेजेने ४२व्या आणि ७४व्या मिनिटाला गोल केले. सुमीत पासी, संदेश झिंगन, मोहम्मद रफीक आणि फुल्गान्को काडरेझो यांनी प्रत्येकी एक गोल केला.

लाओसविरुद्ध व्हिइनटाइन येथे झालेल्या लढतीत भारताने १-० विजय मिळवला होता. त्यामुळे लाओसविरुद्ध ७-१ सरासरीच्या बळावर भारतीय संघ पात्रता स्पर्धेसाठी पात्र ठरला. हा भारतीय संघाचा सर्वाधिक गोलच्या फरकाने मिळवलेला विजय आहे. विजयासह प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटनटाइन यांच्यावरील दडपण कमी झाले आहे.