आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर मात केल्यानंतर आज झालेल्या चीन विरुद्धच्या सामन्यात ९-० असा दणदणीत विजय साजरा केला आहे. भारतीय संघाने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. भारतीय खेळाडूंनी यावेळी आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत आकाशदिप सिंग, अफ्फान युसूफ आणि जसजित सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
चीनच्या संघाला भारतीय संघाने एकही संधी न देता सामन्यावर पूर्ण पकड निर्माण केली होती. चीनची प्रत्येक खेळी भारतीय हॉकीपटूंपुढे निष्प्रभ ठरताना दिसली. चीनला सामन्यात खाते देखील उघडता आले नाही.

याआधी भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर ३-२ असा रोमांचक विजय प्राप्त करून क्रमवारीत दुसरे स्थान गाठले होते. त्यानंतर आज भारतीय संघाने चीनवर मात करून गुणतालिकेत अव्वल स्थान असलेल्या मलेशियाला मागे टाकले आहे. गतविजेत्या पाकिस्तानला आतापर्यंत फक्त तीनच गुण मिळविता आले आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला असून उर्वरित सामन्यांमध्ये त्यांना जपान व चीन यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताला दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत बरोबरी स्वीकारावी लागली होती. या धक्क्य़ातून सावरत भारताने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळविला होता.