आयपीएलचा हंगाम रंगात आलेला असताना, ८ मे रोजी एम.एस.के. प्रसाद यांची निवड समिती अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर विराट कोहली काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. सरे क्रिकेट क्लबकडून विराट काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. कसोटी सामन्यासोबतच इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठीही भारतीय संघाची निवड होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईच्या श्रेयस अय्यरला कसोटी संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.

विराट कोहली सारखी शैली असलेल्या फलंदाजाला संघात स्थान मिळेल. सध्याच्या परिस्थितीत विराट कोहलीसाठी श्रेयस अय्यर हा उत्तम पर्याय आहे. ज्याप्रमाणे रविंद्र जाडेदाला अक्षर पटेल, हार्दिक पांड्याला विजय शंकर हे पर्याय आहेत; त्याचप्रमाणे विराटसाठी श्रेयस हा सध्या पर्याय आहे. निवड समितीतल्या सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. २०१७ साली ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात धर्मशाळा कसोटीसाठी श्रेयस अय्यरची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र कुलदीप यादवला संघात जागा दिल्याने श्रेयस अय्यरला भारतीय संघाकडून पदार्पण करता आलं नव्हतं. त्यामुळे श्रेयस अय्यरला संघात जागा मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.