मुंबई : जागतिक स्तरावरील टेनिसच्या दुसऱ्या श्रेणीतील स्पर्धाच्या रचनेची फेरबांधणी करण्यात आली असून २०१९ सालापासूनच्या एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धामध्ये त्याचा भारतीय खेळाडूंना फटका बसणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या वतीने पुढील वर्षांपासून आयोजित २५ हजार डॉलर्सपेक्षा कमी बक्षीस असलेल्या स्पर्धाना एटीपी क्रमवारीचे गुण दिले जाणार नाहीत. त्यामुळे या नियमाचा फटका आशियाई देशातील स्पर्धाना तसेच महिला टेनिसपटूंनादेखील बसणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले. सध्या भारतात पुरुष आणि महिला मिळून एकूण ६० खेळाडूंना एटीपी आणि डब्ल्यूटीए मानांकन आहे. मात्र, नवीन फेररचनेनुसार पुढील वर्षी अशा मानांकित भारतीय खेळाडूंचे प्रमाण २० च्या आत पोहोचणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले.

चॅलेंजर स्पर्धामध्ये ३२ खेळाडूंऐवजी ४८ खेळाडूंचा समावेश बंधनकारक करण्यात आल्यामुळे आयोजकांच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे. भारतात सध्या तीन चॅलेंजर स्पर्धा खेळवल्या जातात. एक बेंगळूरुत, दुसरी लवकरच होणारी केपीआयटी चॅलेंजर तर चेन्नईत जानेवारीमध्ये होणारी तिसरी स्पर्धा यांचा समावेश असून त्यात अजून दोन स्पर्धा वाढविल्या जाणार आहेत. टेनिसमधील फेरबदल हा भारतासह कोणत्याही आशियाई देशांसाठी फायद्याचा नाही.

अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या वतीने मला योग्य बदल सुचवण्यासाठी केलेल्या समितीच्या प्रमुखपदी नेमण्यात आलेले आहे. तसेच १५ डिसेंबपर्यंत बदल सुचवण्याची जबाबदारी देण्यात आल्याचेही अय्यर यांनी सांगितले.

दरम्यान डेव्हिस चषकपटू रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन या जागतिक क्रमवारीत १२० ते १५० दरम्यान स्थान असलेल्या दोघा भारतीय टेनिसपटूंनाच पुण्यात होणाऱ्या केपीआयटी चॅलेंजर टेनिस क्रीडा स्पर्धेत मानांकन देण्यात आले आहे.