वेस्ट इंडिजविरुद्ध आज दुसरा ट्वेन्टी-२० सामना

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका

लखनौ : वेस्ट इंडिजची भारताविरुद्धची मालिका पराभवाची गाथा सुरू असून आता ट्वेन्टी-२० मालिकेवरही वर्चस्व गाजविण्याचा निर्धार भारतीय संघाने बाळगला आहे. मंगळवारी लखनौ येथे रंगणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडिजला रिकाम्या हाती परतवून लावण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे.

भारताची वेस्ट इंडिजविरुद्धची चार सामन्यांची पराभवाची मालिका अखेर कोलकाता येथे रविवारी संपुष्टात आली. आता भारत दौऱ्यातील अखेरच्या सामन्यातही पाहुण्या वेस्ट इंडिजपेक्षा भारताचेच पारडे जड आहे. यापूर्वी भारताने वेस्ट इंडिजवर २३ मार्च २०१४ रोजी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील अखेरचा विजय बांगलादेश येथे विश्वचषक टी-२० स्पर्धेदरम्यान मिळवला होता. ईडन गार्डन्सवरील विजयानंतर २००९ ते २०१७ दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या नऊ सामन्यांमध्ये ५-३ अशी सरशी साधली आहे.

कोलकाता येथे भारताने पाच गडी शिल्लक राखून विजय मिळवला असला तरी यजमानांना कर्णधार विराट कोहलीची उणीव प्रकर्षांने जाणवली. सध्या फॉर्मात नसलेल्या महेंद्रसिंग धोनीशिवाय भारत पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० सामना खेळला. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाची सूत्रे सांभाळत असला तरी त्याने आतापर्यंत आपल्यावरील जबाबदारीला योग्य न्याय दिला आहे. रोहितसह सलामीवीर शिखर धवन, लोकेश राहुल, युवा ऋषभ पंत आणि मनीष पांडे या अव्वल फलंदाजांनी पहिल्या सामन्यात सपशेल निराशा केली; पण दिनेश कार्तिकने जबाबदारीने केलेली ३१ धावांची खेळी आणि पदार्पणवीर कृणाल पंडय़ाच्या नाबाद २१ धावांच्या योगदानामुळे भारताने वेस्ट इंडिजचे १११ धावांचे आव्हान १७.५ षटकांत पार केले.

नव्याने बांधलेल्या लखनौमधील ईकाना स्टेडियममध्ये पहिल्यांदाच सामना होत असल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल, त्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.  या खेळपट्टीवर खेळण्याचा दोन्ही संघांना अनुभव नसला तरी या सामन्यातही यजमानांचे वर्चस्व असेल, अशी अपेक्षा आहे. गोलंदाजीत भारताच्या कुलदीप यादवने छाप पाडली, तर डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि कृणालने उपयुक्त योगदान दिले. जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव यांनी चांगली गोलंदाजी केली तरी त्यांना आता भुवनेश्वर कुमारची साथ लाभणार आहे.

दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघ सकारात्मक दृष्टिकोनातून घरी परतण्यासाठी सज्ज असल्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचे पाहुण्यांचे ध्येय आहे. दोन महिन्यांच्या प्रदीर्घ भारत दौऱ्यात विंडीजने कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली. आता किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात परतल्याने वेस्ट इंडिजची बाजू भक्कम झाली आहे. मात्र तरीही पाहुण्या संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सुमार कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तरी विंडिजचा संघ चमकदार कामगिरीसह परतण्याची शक्यता आहे.

आंद्रे रस्सेलने दुखापतीमुळे माघार घेतल्याचा फटका वेस्ट इंडिजला बसला. कर्णधार कालरेस ब्रेथवेटने गोलंदाजीत सुरेख कामगिरी केली, मात्र अन्य सहकाऱ्यांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्याला आहे. युवा गोलंदाज ओशेन थॉमसने भारतीय फलंदाजांना चकवले होते, आता त्याच्यासह कीमो पॉल आणि अन्य गोलंदाजांकडूनही उपयुक्त योगदानाची अपेक्षा वेस्ट इंडिजला आहे.

ट्वेन्टी-२० क्रिकेट हे फलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते, पण लखनौच्या खेळपट्टीवर धावांची बरसात कमी होईल, असे क्युरेटरचे म्हणणे आहे. ‘‘या खेळपट्टीवर दोन्ही बाजूला मोठे गवत असून खेळपट्टीला तडेही गेले आहेत. धीम्या गतीच्या या खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच फिरकीपटूंचे वर्चस्व राहील, असा अंदाज आहे. ओदिशाच्या बोलांगिर येथून आणलेल्या मातीने खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना धावा करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या संघाने १३० धावा केल्या तरी त्यांचा विजय निश्चित होईल,’’ असे येथील स्थानिक क्युरेटरने सांगितले.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाझ नदीम.

वेस्ट इंडिज : कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, शाय होप, ओबेड मॅककॉय, कीमो पॉल, खारी पाएरे, किरॉन पोलार्ड, निकोलस, पूरन, रोवमन पॉवेल, दिनेश रामदीन, शेर्फने रुदरफोर्ड, ओशेन थॉमस.

() लखनौत नव्याने बांधलेल्या ईकाना स्टेडियमवर रंगणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.

(१०)कर्णधार म्हणून रोहित शर्माने पहिल्या १० ट्वेन्टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे.

’सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वा.पासून

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, एचडी.

१३० धावांचा पाठलाग करणेही कठीण