२०१७मध्ये होणाऱ्या १७-वर्षांखालील वयोगटासाठी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले आहे. ब्राझीलमधील सॅल्व्हेडर डा बहिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या प्रतिष्ठेच्या स्पध्रेसाठी भारताच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
२४ राष्ट्रांचा सहभाग असलेल्या या स्पध्रेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारताने दक्षिण आफ्रिका, आर्यलड आणि उझबेकिस्तान या अन्य यजमानांना मागे टाकले. यजमानपद लाभल्यामुळे भारताला प्रथमच या स्पध्रेत सहभागी होण्याची संधीसुद्धा चालून आली आहे.
‘‘भारताने २०१७मध्ये होणाऱ्या विश्वचषक (१७-वर्षांखालील) फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद मिळवण्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे,’’ अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास यांनी दिली.
देशाच्या क्रीडा इतिहासात प्रथमच फिफाची स्पर्धा होणर असून, फुटबॉलमधील एवढय़ा प्रतिष्ठेची स्पर्धाही होण्याचा मानही प्रथमच मिळत आहे. २००६मध्ये भारताने आशियाई फुटबॉल को-फेडरेशन युवा अजिंक्यपद (२० वर्षांखालील) स्पध्रेचे यजमानपद सांभाळले होते. त्यानंतर २००८मध्ये एएफसी चॅलेंज चषक स्पर्धा भारतात झाली होती. परंतु फिफाची कोणतीही स्पर्धा आतापर्यंत देशात झाली नव्हती.
या स्पध्रेच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. या वर्षी संयुक्त अरब अमिरातीने या स्पध्रेचे यजमानपद सांभाळले होते, तर २०१५मध्ये चिलीमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
सरकारकडून हमी मिळण्यात विलंब झाल्यामुळे भारताचा यजमानपदासाठीचा दावा उशिराने दाखल झाला होता. या स्पध्रेचे सामने सहा ते आठ शहरांमध्ये होणार आहेत. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, गुवाहाटी, मडगाव, कोची आणि बंगळुरू या शहरांचा त्यात समावेश असेल.
फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर आणि मग सचिव जेरोम व्हाल्के भारत दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यामुळेच त्यांनी भारताच्या यजमानपदाचे समर्थन केले.