अबू धाबी : थायलंडविरुद्ध भारताने मोठा विजय मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले असले तरी त्यापेक्षा उच्च दर्जाचा खेळ भारताला यजमान संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध गुरुवारी करून दाखवावा लागणार आहे. भारतीय संघ चांगल्या तयारीत असला तरी यजमानांसमोर त्यांच्याच मैदानावर आणि त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत खेळताना भारतीय संघाचा खरा कस लागणार आहे.

भारताने थायलंडला ४-१ असे पराभूत केले, तो विजय सर्व भारतीय चाहत्यांसाठी सुखद धक्का होता. मात्र, त्या कामगिरीचे सातत्य भारताला अरब अमिरातीविरुद्ध दाखवावे लागणार आहे. फिफाच्या जागतिक क्रमवारीत अरब अमिरातीचा संघ हा ७९ व्या तर भारत ९७ व्या स्थानावर आहे. अमिरातीचा संघ २०१५ साली २४ व्या स्थानावर होता. त्यामुळे क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर बरोबरीत रोखणे ही चमकदार कामगिरी ठरू शकते.

थायलंडविरुद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारताला ३ गुणांची कमाई करता आली असून अव्वल स्थानीही मजल मारली आहे. भारताने १-१ अशा बरोबरीनंतर न अडखळता सातत्याने आक्रमक चढाया केल्याने प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन भारतीय संघावर नक्कीच खूश आहेत. ‘‘आमच्याकडे अत्यंत दर्जेदार युवा संघ आहे. त्यांच्याकडे प्रचंड उत्साह आहे. गेला सामना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र, अमिराती हा वेगळ्या प्रकारचा आणि भिन्न दर्जाचा संघ आहे. हा फरक लक्षात घेऊन आम्हाला खेळ करावा लागणार आहे.

भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने थायलंडविरुद्ध केलेल्या दोन गोलमुळे आत्मविश्वास अधिकच दुणावला आहे. ही भारताच्या बाजूने सर्वाधिक जमेची बाजू आहे. भारतीय संघ छेत्रीच्या कामगिरीवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे, हे वास्तव आहे. त्यामुळेच भारत सलग १३ सामन्यांमध्ये अपराजित राहिला आहे.

सामन्याची वेळ : रात्री ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि ३