आज भारताचा वेस्ट इंडिजशी तिसरा एकदिवसीय सामना

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी होणारा तिसरा सामना जिंकून एकदिवसीय मालिकेवर कब्जा करण्याचे मनसुबे रचणाऱ्या भारतीय संघाला सलामीवीर शिखर धवनचे सातत्यपूर्ण अपयश चिंतेचे ठरत आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुखापतीतून सावरल्यानंतर धवनचे पुनरागमन फारसे प्रभावी ठरलेले नाही. ट्वेन्टी-२० मालिकेत त्याला अनुक्रमे १, २३, ३ धावा करता आल्या आहेत, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त २ धावा केल्या. आत येणाऱ्या चेंडूवर फसणारा धवन दोनदा वेगवान गोलंदाज शेल्डर कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताच्या कसोटी संघात समाविष्ट नसलेल्या दिल्लीच्या धवनला कामगिरी दाखवण्याची ही अखेरची संधी असेल. कर्णधार विराट कोहलीने १२५ चेंडूंत १२० धावांची दमदार खेळी उभारत दुसऱ्या सामन्यातील विजयात सिंहाचा वाटा उचलला. धवन आणि रोहित शर्मा झटपट तंबूत परतल्यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताचा डाव सावरला.

शमीऐवजी सैनीला संधी?

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने महत्त्वाची भूमिका बजावताना ८ षटकांत ३१ धावांत ४ बळी मिळवले. मोहम्मद शमीने त्याला तोलामोलाची साथ देताना ३९ धावांत २ बळी घेतले. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनेही दोन फलंदाजांना बाद केले; परंतु यासाठी त्याने ५९ धावा मोजल्या. तिसऱ्या लढतीत विजयी संघ बदलण्याची शक्यता कमी असली तरी शमीला विश्रांती देऊन नवदीप सैनीला संधी विराट देऊ शकतो.

चौथ्या स्थानासाठी अय्यर योग्य

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करीत ६८ चेंडूंत ७१ धावांची दिमाखदार खेळी साकारून अय्यरने फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावर भक्कम दावा केला आहे. त्यामुळे ऋषभ पंतवरील दडपण वाढले आहे. संघ व्यवस्थापनाचे पाठबळ असलेला पंत सातत्याने अपयशी ठरत आहे. विश्वचषक स्पर्धेतही चौथ्या स्थानाचा मुद्दा ऐरणीवर होता. अय्यर चौथ्या क्रमांकाला न्याय देऊ शकेल. त्यामुळे पंतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, अशी सूचना महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी केली आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एव्हिन लेविस, शाय होप, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फॅबियान ऑलीन, कालोर्सस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डर कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच.

अखेरच्या सामन्यात गेल छाप पाडणार?

* अखेरचा सामना जिंकून मालिका वाचवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ उत्सुक आहे. मात्र याकरिता ख्रिस गेल, शाय होप, शिम्रॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांच्यासारख्या फलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे.

* स्फोटक फलंदाज

ख्रिस गेलला पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ४ (३१ चेंडू), ११ (२४ चेंडू) धावाच करता आल्या आहेत.

* धावांसाठी झगडणारा गेल किमान कारकीर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तरी छाप पाडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

* सामन्याची वेळ : सायं. ७ वा.  ’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ (इंग्रजी), सोनी टेन ३ (हिंदी)