2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आतापासूनच खबरदारी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात विश्रांती देण्यात आली होती. यानंतरही आगामी टी-20 आणि वन-डे मालिकांसाठी संघातील महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यासारख्या महत्वाच्या गोलंदाजांना आगामी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते.

विश्वचषकासाठी विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त हवा असेल तर त्याला पुन्हा एकदा विश्रांती दिली जाऊ शकते. आगामी विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ मैदानात उतरावा यासाठी बीसीसीआय रोटेशन पॉलिसी अवलंबत असल्याचं, एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. संघातील महत्वाच्या खेळाडूंवर अतिक्रिकेटचा भार येऊ नये यासाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला विंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

कसोटी मालिकेतंनतर भारतीय संघ विंडिजविरुद्ध वन-डे आणि टी-20 मालिका खेळेल. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही भारतीय संघाला वन-डे, टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र या सर्व दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला विश्रांतीसाठी फार कमी दिवस मिळणार आहेत. याचसोबत 2019 मध्ये विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना आयपीएलमध्येही सहभागी व्हायचंय. या सर्व मालिकांचा विचार केला असता बीसीसीआय महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे.

अवश्य वाचा – U-19 Asia Cup : भारताने सहाव्यांदा पटकावला चषक; अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात