भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि टेन स्पोर्ट्स यांच्यातील वादामुळे भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला होता. या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या ‘अ’ स्वरूपाच्या संघाच्या निवडीचे संकेत देत बीसीसीआयने या दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे.
झिम्बाब्वे दौऱ्याच्या प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्ट्स वाहिनीकडे आहेत. ही वाहिनी झी-एस्सेल समूहाचा भाग आहे. या समूहातर्फे इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर पर्यायी ट्वेन्टी-२० लीग सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि टेन स्पोर्ट्स यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादामुळे हा दौरा लांबणीवर पडण्याची चिन्हे होती. मात्र आता हा दौरा होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
सोमवारी निवड समितीची बैठक होणार असून, त्यावेळी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. या बैठकीत तिरंगी मालिकेसाठी भारतीय अ संघाचीही निवड करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या अ संघादरम्यान चेन्नई आणि वायनाड येथे तिरंगी मालिका होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि २ ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.