बांगलादेश दौरा समाप्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती झिम्बाब्वे क्रिकेट संघटनेने दिली आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. दौऱ्याकरिता भारतीय संघ ७ जुलैला झिम्बाब्वेत दाखल होणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापक अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘ संबंधित संघटनांची या दौऱ्याला मान्यता मिळाली आहे. भारतीय संघ ७ जुलैला झिम्बाब्वेत दाखल होईल आणि तीन एकदिवसीय व दोन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका पूर्ण करून २० जुलैला मायदेशी परतणार आहे.
या स्पध्रेचे वेळापत्रक जवळपास तयार असून आठवडय़ाच्या अखेरीस त्याची घोषणा करण्यात येईल. मालिकेतील सर्व सामने हरारे येथे खेळविण्यात येतील.’’
जुलै २०१३ मध्ये भारताने अखेरचा झिम्बाब्वे दौरा केला होता आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या त्या मालिकेत भारताने ५-० असा दणदणीत विजय साजरा केला होता.