भारताने वेल्स संघावर ३-१ अशी मात करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकीत विजयी सलामी केली. मात्र गतवेळी उपविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाने अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ केला नाही.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारताला वेल्स संघाने बचावात्मक खेळात सुरेख लढत दिली. भारताकडून व्ही. आर. रघुनाथ (२०व्या मिनिटाला), रुपींदरपाल सिंग (२४व्या मिनिटाला) यांनी पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केले तर संघात पुन्हा स्थान मिळविणाऱ्या गुरविंदरसिंग चंडी याने ४७व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाच्या विजयास हातभार लावला. वेल्स संघाचा एकमेव गोल अँड्रय़ु कॉर्निक याने २३ व्या मिनिटाला केला.
स्क्वॉशमध्ये चिनप्पा पराभूत
भारताच्या जोस्त्ना चिनप्पा हिला स्क्वॉशमधील महिलांच्या एकेरीत पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडच्या जोएली किंग हिने तिला ११-३, ११-८, ८-११, ११-५ असे पराभूत केले. किंग हिने नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते. किंग हिने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिले दोन गेम जिंकले. तिसरा गेम जिंकून जोश्नाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण चौथ्या गेममध्ये तिची झुंज अपयशी ठरली. अखेर तिला पराभवाचा सामना करावा लागला.