चार सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई

युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर भारताने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह पदक तालिकेत प्रथमच अव्वल स्थान मिळवले आहे. मेक्सिकोत झालेल्या या स्पध्रेत भारताने चार सुवर्णपदकांबरोबरच एक रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली.

अखेरच्या दिवशी ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या व्हिन्सेंट हॅन्कॉकने पुरुषांच्या स्कीट प्रकारात अपेक्षेप्रमाणे सोनेरी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या पॉल अ‍ॅडम्सला रौप्यपदक मिळाले तर इटलीच्या तामारो कॅसाँड्रो याने कांस्यपदक पटकावले.  या प्रकारात भारताच्या अंगद बाजवाने १८वे स्थान मिळवले तर त्याचा सहकारी शिराझ शेखने ११२ गुणांसह ३०वा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत भारताच्या शहझार रिझवी, मनू भाकेर, अखिल शेरॉन व ओमप्रकाश मिथार्वाल यांनी सुवर्णपदक जिंकले. पदक तालिकेत अमेरिकेने तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांसह दुसरे स्थान मिळवले. चीनला दोन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशा पाच पदकांसह तिसरे स्थान मिळाले.