ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने गमावली असली तरी त्यांना तोडीस तोड उत्तर भारतीय संघाने या वेळी दिले. याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘‘मालिकेचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही. चौथ्या कसोटीतही आम्हाला जिंकण्याची संधी होती; पण ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यापुढे आम्हाला सामना अनिर्णीत राखावा लागला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत कडवी झुंज दिली.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘या मालिकेमध्ये जशा काही सकारात्मक गोष्टी पुढे आल्या तशाच कोणत्या गोष्टींवर अधिक भर द्यायला हवा, हेदेखील आम्हाला समजले आहे. फलंदाजीमध्ये मी इंग्लंड दौऱ्यानंतर काही गोष्टींमध्ये बदल केला आणि त्याचा मला फायदा झाला. सलामीवीर मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार फलंदाजी केली, त्याचबरोबर युवा लोकेश राहुलनेही विश्वास सार्थ ठरवला; पण फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही सातत्य राखू शकलो नाही. गोलंदाजीवर आम्हाला अधिकाधिक लक्ष द्यायला हवे, हे या मालिकेतून शिकण्यासारखे आहे.’’