ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने यजमानांवर ३१ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांत आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे कांगारुंची झुंज अपयशी ठरली आणि भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४ बाद १०४ या धावसंख्येवरुन अंतिम दिवसाचा खेळ सुरु झाला. पहिल्याच सत्रात ट्रेव्हिस हेड (१४) लगेचच बाद झाला. अर्धशतकी खेळी करून शॉन मार्शही (६०) माघारी परतला. त्यानंतर खेळात उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने कर्णधार टीम पेनच्या खेळीच्या जोरावर आपली झुंज सुरु ठेवली. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावत १८६ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. टीम पेनला (४१) बुमराहने माघारी धाडले. शमीने स्टार्कला (२८) तंबूचा रस्ता दाखवला. दीर्घकाळ खेळपट्टीवर तग धरून खेळणाऱ्या पॅट कमिन्सची झुंज अखेर अपयशी ठरली. १२१ चेंडूत २८ करून तो बाद झाला. बुमराहने त्याचा अडसर दूर केला.

त्याआधी भारताने दुसऱ्या डावात भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियापुढे सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान ठेवले. फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले आणि भारताच्या धावसंख्येला लगाम लावला. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अर्धशतके ठोकली आणि भारताला समाधानकारक आघाडी मिळवून दिली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे जोडीने भारताच्या खात्यात धावसंख्येची भर घालत डावाला आकार दिला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. पुजाराने ७१ तर रहाणेने ७० धावा केल्या. लॉयनच्या ६ गड्यांव्यतिरिक्त स्टार्कने ३ तर हेजलवूडने १ गडी माघारी धाडला.

दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात २५० धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियायचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला होता.

Live Blog

09:54 (IST)10 Dec 2018
कमिन्सची झुंज संपुष्टात; भारताला विजयासाठी १ बळीची गरज

दीर्घकाळ खेळपट्टीवर तग धरून खेळणाऱ्या पॅट कमिन्सची झुंज अखेर अपयशी ठरली. १२१ चेंडूत २८ करून तो बाद झाला. बुमराहने त्याचा अडसर दूर केला.

09:27 (IST)10 Dec 2018
मिचेल स्टार्क माघारी, कांगारुंचा आठवा गडी माघारी

मोहम्मद शमीने दूर केला स्टार्कचा अडसर

08:28 (IST)10 Dec 2018
कर्णधार टीम पेन माघारी, ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने घेतला झेल

07:43 (IST)10 Dec 2018
उपहारापर्यंत कांगारुंची झुंज सुरुच

टीम पेनकडून भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना, ऑस्ट्रेलिया ६ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा

06:41 (IST)10 Dec 2018
बुमराहने ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली, मार्श माघारी

६० धावांवर असताना शॉन मार्श झेलबाद होऊन माघारी. ऑस्ट्रेलियाचा सहावा आणि महत्वाचा गडी माघारी

06:10 (IST)10 Dec 2018
शॉन मार्शची एकाकी झुंज, झळकावलं अर्धशतक

शॉन मार्शने भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत अर्धशतकाची नोंद केली आहे.

06:06 (IST)10 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, ट्रॅविस हेड माघारी

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने घेतला झेल