पहिल्या टी-२० सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी पराभव केला आहे. चहल आणि नटराजन यांच्या भेदक माऱ्यापुढे कांगांरुंनी नांगी टाकली. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित २० षटकांत १६१ धावांपर्यंत मजल मारली. भारतानं दिलेल्या १६२ धावांच्या आवहानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं आश्वासक सुरुवात केली. पहिल्या षटकांत भारतीय खेळाडूंनी झेलही सोडले पण चहलच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्यानं भन्नाट झेल घेतला. हा झेल पाहून तुम्ही पांड्याला सुपरमॅन म्हटल्याशिवाय राहणार नाहीत.

चहलच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर अॅरोन फिंचनं हवेत चेंडू मारला. सिमारेषेवर उभा असलेला पांड्यानं धावत येऊन हवेत झेपवत भन्नाट झेल घेतला. ५६ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सावरलाच नाही. चहल आणि नटराजन या जोडगोळीनं सहा गड्यांना बाद केलं.  क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पांड्यानं घेतलेला झेल ट्विटरवर पोस्ट केला आहे.

के. एल राहुल आणि जाडेजाच्या तुफानी खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांत १६१ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १५० धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

म्हणून संघात नसतानाही चहलनं गेली गोलंदाजी –

फलंदाजी करत असताना जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असताना सामनाधिकारी डेव्हीड बून यांनी जाडेजाच्या बदली युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यास मान्यता दिली. एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्यावर मार लागला असेल तर सामनाधिकारी त्या संघाची बदली खेळाडूची विनंती मान्य करु शकतात. पण त्या खेळाडूचा समावेश केल्यामुळे संघाला अतिरिक्त फायदा होणार नाही याची काळजी घेऊनच सामनाधिकारी हा निर्णय घेऊ शकतात.