India tour of australia 2020 : तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताला २-१ न पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय सामन्याच्या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तीन सामन्याच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. कॅनबेरा येथील मैदानावर शुक्रवारी, ४ डिसेंबर रोजी पहिला टी-२० सामना होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही टी-२० मालिका महत्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघ तयारीसाठी पूर्ण ताकदीनं मैदानात उरतील.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं असेल. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत असल्याचं दिसतेय. त्यातच भारतीय संघ नुकतेच आयपीएल खेळून आला आहे. त्यामुळे टी-२० मालिकेत भारताला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा संघही घरच्या मैदानावर पराभव स्विकारु शकत नाही. त्यामुळे दोन्ही संघात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामन्याचा इतिहास पाहिल्यास विराटसेना वरचढ असल्याचं दिसत आहे. पाहूयात दोन्ही संघात आतापर्यंत किती टी-२० सामने झाले आणि कोणी किती जिंकले…..

१) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत २१ टी-२० सामने झाले आहेत. याध्ये भारतीय संघानं ११ सामन्यात बाजी मारली आहे. तर ८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. एका सामना रद्द झाला तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

२) २००७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी-२० सामना झाला होता. या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता.

३) २०१९ मध्ये दोन्ही संघामध्ये अखेरचा टी-२० सामना झाला होता. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

४) दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत १४ टी-२० मालिका झाल्या आहेत. यामधील सर्व द्विपक्षीय मालिका नव्हत्या. भारतानं आतापर्पंत चार टी-२० मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला फक्त एका मालिकेत विजय मिळवता आला आहे. ८ मालिकामध्ये इतर देशाचा विजय झाला आहे.