भारतीय कर्णधार विराट कोहलीला जगातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखलं जातं. कोहलीकडून झेल सुटल्याचं फारसं ऐकला किंवा पाहायला मिळत नाही. पण ऑस्ट्रेलियाविराधात सुरु असलेल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीकडून सोप्पा झेल सुटला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामी फलंदाज मॅथ्यू वेड ५८ धावांवर खेळत असताना सुंदरच्या गोलंदाजीवर विराट कोहलीकडून अगदी सोपा झेल सुटला .

मोठा फटका मारण्याच्या नादात आठव्या षटकातील अखेरचा चेंडू मॅथ्यू वेडच्या बॅटचा कट लागून कव्हरवर उभा असलेल्या विराटच्या हातात गेला. मात्र, विराटकडून झेल घेण्याच्या नादात तीन वेळा चेंडू सुटला. या गोंधळात फलंदाजी करत असणारा मॅथ्यू वेड आणि नॉन स्ट्राइकवर असणाऱ्या स्मिथमध्ये गोंधळ झाला. धाव घ्यायची की नाही? यामध्ये दोघांमध्ये ताळमेळ नसल्याचं दिसलं. विराट कोहलीनं झेल सुटल्यानंतर तात्काळ थ्रो यष्टीरक्षक के. एल. राहुलकडे फेकला. राहुलनेही लगेच यष्ट्या उखाडल्या. विराटकडे झेल गेल्यानंतर मॅथ्यू वेडही मैदानसोडून बाहेर निघाला होता.. त्यानंतर कॅच सुटल्यानंतर धाव घेण्यासाठी दोन्ही खेळाडूमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळेच त्याला यष्टीकडे वेळेवर पोहचला आलं नाही.

फिंचच्या अनुपस्थितीत मॅथ्यू वेडनं कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. मॅथ्यू वेडनं ऑस्ट्रेलियाला तुफानी सुरुवात करुन दिली. मॅथ्यू वेडनं ३२ चेंडूत १० चौकार आणि एक षटकाराच्या मदतीनं धडाकेबाज ५८ धावांची खेळी केली. मॅथ्यू वेडच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं १२ षटकांत १११ धावा केल्या आहेत.