सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला ३९० धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपवलं नाही.
भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.
दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
स्टिव्ह स्मिथचं आक्रमक शतक आणि इतर फलंदाजांनी त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८९ धावांचा डोंगर उभा केला. स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत १०४ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनीही उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून शमी, बुमराह आणि पांड्याने १-१ बळी घेतला.
पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू बुमराह आणि शमीची षटकं सावधपणे खेळून काढत फिंच आणि वॉर्नर जोडीने खेळपट्टीवर आपला जम बसवला. यानंतर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच फटकेबाजी सुरुवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात अपयशी ठरले. दोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. अखेरीस मोहम्मद शमीने कर्णधार फिंचला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं, त्याने ६० धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही जाडेजाच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव घेत असताना श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद झाला. वॉर्नरने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८३ धावा केल्या.
यानंतर मैदानावर आलेल्या स्टिव्ह स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला स्मिथने पुन्हा एकदा बॅकफूटला ढकललं. मार्नस लाबुशेनसोबत स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत स्मिथने चौफेर फटकेबाजी केली. ६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने स्मिथने १०४ धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ शमीकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लाबुशेनने मॅक्सवेलच्या साथीने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्या गाठून दिली. यादरम्यान लाबुशेनने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ४९ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर ७० धावा काढून तो माघारी परतला. नवदीप सैनीच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेलनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं, त्याने नाबाद ६३ धावा केल्या.
विजयासह कांगारुंची मालिकेत २-० ने विजयी आघाडी, भारतीय संघाची ३३८ धावांपर्यंत मजल
झॅम्पाने घेतला बळी, टीम इंडियाला नववा धक्का
मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शमी बाद
रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या मोठे फटके खेळताना झेलबाद, भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या
परंतू विजयासाठी टीम इंडियासमोरचं आव्हान अधिक खडतर
झॅम्पाच्या गोलंदाजीवर राहुलचं आक्रमण, परंतू फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हेजलवूडकडे झेल देत राहुल माघारी
६६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह राहुलची ७६ धावांची खेळी
फटकेबाजी करत झळकावलं अर्धशतक, हार्दिक पांड्याच्या सोबतीने सावरला भारताचा डाव
सामन्यात भारतीय संघाच्या आशा अजुनही पल्लवित
हेजलवूडच्या गोलंदाजीवर चौकार लगावण्याच्या प्रयत्नात हेन्रिकेजने पकडला कोहलीचा सुरेख झेल
भारताला चौथा धक्का, ८७ चेंडूत ८९ धावा काढत कोहली माघारी. अर्धशतकी खेळीत विराटचे ७ चौकार आणि २ षटकार
कर्णधार - उपकर्णधार लढवत आहेत भारताचा किल्ला, फटकेबाजी करणाऱ्या विराटला लोकेश राहुलचीही उत्तम साथ
भारतीय संघाने ओलांडला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा, भारताचं आव्हान अद्याप कायम
श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतरही कोहलीची झुंज सुरु, सचिन-रोहितच्या पंगतीत मानाचं स्थान. जाणून घ्या सविस्तर
श्रेयस अय्यर हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथकडे झेल देऊन माघारी, भारताला तिसरा धक्का
भारताकडून श्रेयस-विराटची यशस्वी ९३ धावांची भागीदारी संपुष्टात
श्रेयस अय्यरच्या साथीने विराटची तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी
मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांकडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना
भारतीय संघाने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा
पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर टप्पा पडून बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न
चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक कॅरीच्या हातात, मयांकची २८ धावांची खेळी
शिखर धवन जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर माघारी, २३ चेंडूत ३० धावा करत शिखर बाद
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्टार्ककडे झेल देत धवन माघारी
मयांक अग्रवाल आणि शिखर धवन जोडीची पहिल्या षटकापासून फटकेबाजीला सुरुवात
सातव्या षटकात ओलांडला ५० धावांचा टप्पा
ग्लेन मॅक्सवेलकडून नवदीप सैनीची धुलाई, ३८९ धावांपर्यंत मजल
भारतीय संघाला विजयासाठी ३९० धावांचं आव्हान
२५ चेंडूत झळकावलं अर्धशतक, नवदीप सैनीच्या गोलंदाजीचा घेतला समाचार
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लाबुशेन मयांक अग्रवालच्या हाती झेल देऊन माघारी
लाबुशेनची ७० धावांची महत्वपूर्ण खेळी, भारताला चौथं यश
ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फटकेबाजी सुरुच, सलग दुसऱ्या सामन्यात ओलांडला त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्मिथ बाद, ६४ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह स्मिथच्या १०४ धावा
भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत स्मिथची सिडनीच्या मैदानात चौफेर फटकेबाजी
पहिल्या वन-डे सामन्यातील शतकी खेळीची पुनरावृत्ती
भारतीय गोलंदाजांचा सामना करत झळकावलं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
स्टिव्ह स्मिथ - लाबुशेन जोडीची सावध फलंदाजी
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश, पण...वाचा सविस्तर
रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव काढत असताना वॉर्नर श्रेयस अय्यरच्या अचूक फेकीमुळे धावबाद
७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह वॉर्नरच्या ८३ धावा, भारताला दुसरं यश
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर खेळताना फिंचचा अंदाज चुकला, चेंडू बॅटची कड घेऊन हवेत. कर्णधार विराट कोहलीने घेतला झेल
६९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह फिंचच्या ६० धावा, सलामीच्या जोडीसाठी वॉर्नरसोबत फिंचची १४२ धावांची भागीदारी
पहिल्या सामन्यात शतक झळकावलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराची दुसऱ्या वन-डे सामन्यातही धडाकेबाज खेळी
वॉर्नर फटकेबाजी करत असताना एक बाजू लावून धरत फिंचचं अर्धशतक, टीम इंडियाचे गोलंदाज हतबल
टीम इंडियाचे गोलंदाज विकेट काढण्यात पुन्हा एकदा अपयशी
वॉर्नर-फिंच जोडीची फटकेबाजी
ही आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वास...
भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत वॉर्नरचं ३९ चेंडूत अर्धशतक
अर्धशतकी खेळीत वॉर्नरचे ६ चौकार आणि २ षटकार. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात टीम इंडियाचे गोलंदाज पुन्हा अपयशी
८ व्या षटकात ओलांडला ५० धावांचा टप्पा
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची सुरुवातीची षटकं सांभाळून खेळल्यानंतर वॉर्नरचा सैनीवर हल्लाबोल, फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी मैदानावर जम बसवला.
पहिल्या सामन्यातील शतकवीर फिंचला जखडवून ठेवण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी
बुमराह, शमी फॉर्मात परतले, ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, दुखापतग्रस्त स्टॉयनिसला विश्रांती