07 March 2021

News Flash

Ind vs Aus : कोहलीची ‘विराट’ खेळी निष्फळ, अखेरच्या टी-२० मध्ये कांगारुंची बाजी

विराटची ८५ धावांची खेळी व्यर्थ

अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.

१८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करत धावांचा ओघ वाढवण्यास सुरुवात केली. ही जोडी भारताचा डाव सावरणार असं वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर संजू सॅमसननेही तिसऱ्या सामन्यात निराशाजनक खेळ करत आपली विकेट फेकली.

दुसरीकडे विराटने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सॅमसन माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी करत विराटने सामन्यात रंगत आणली. यानंतर हार्दिक पांड्यानेही रंगात येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. परंतू कर्णधार फिंचने आपला हक्काचा फिरकीपटू झॅम्पाला पाचारण केलं, आणि १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झॅम्पानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात अँड्रू टायने विराटला माघारी धाडत भारताच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फिरवलं.

त्याआधी,यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तिसऱ्या टी-२० त अतिशय खराब कामगिरी करत सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावला. पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच सुंदरने स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं, स्मिथने २४ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने मॅथ्यू वेडने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफर फटकेबाजी केली. ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत काही सुरेख फटके खेळले. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंची जोडी फोडली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने १-१ बळी घेतला.

Live Blog

17:28 (IST)08 Dec 2020
अखेरच्या टी-२० त यजमान ऑस्ट्रेलियाची बाजी

भारतावर १२ धावांनी मात, परंतू मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारताला यश

17:17 (IST)08 Dec 2020
अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर माघारी

मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अबॉटच्या गोलंदाजीवर सुंदर माघारी, भारताला सातवा धक्का, विजयाच्या आशा मावळल्या

17:13 (IST)08 Dec 2020
भारताला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी

१९ व्या षटकात अँड्रू टायच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याचा विराटचा प्रयत्न, सम्सने घेतला सुरेख झेल

६१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह विराटची ८५ धावांची खेळी

17:06 (IST)08 Dec 2020
झॅम्पाने फोडली भारताची जमलेली जोडी

फटकेबाजी करण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला, चेंडू बॅटची कड घेऊन फिंचच्या हातात. भारताला पाचवा धक्का

17:05 (IST)08 Dec 2020
पांड्या - कोहली जोडीची फटकेबाजी

पांड्या-कोहलीकडून अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात, डॅनिअल सम्स, अँड्रू टाय यांच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाजांचा हल्लाबोल

सिडनीच्या मैदानावर दोन्ही फलंदाजांची चौफेर फटकेबाजी

16:45 (IST)08 Dec 2020
स्वेप्सनचा भारताला आणखी एक धक्का

टप्पा पडून आत येणाऱ्या चेंडूवर श्रेयस अय्यर फसला, भोपळाही न फोडता परतला माघारी

पंच रुड टकर यांच्या निर्णयाला भारताचं आव्हान, तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही श्रेयस बाद असल्याचं निष्पन्न

16:44 (IST)08 Dec 2020
भारतीय संघ सामन्यात बॅकफूटवर

तेराव्या षटकात गाठला शतकी धावसंख्येचा टप्पा, विराटची एकाकी झुंज

16:41 (IST)08 Dec 2020
भारताला तिसरा धक्का, संजू सॅमसनची हाराकिरी

स्वेप्सनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सॅमसन सीमारेषेवर स्मिथकडे झेल देऊन माघारी

संधी असतानाही सॅमसनचा निराशाजनक खेळ, अवघ्या १० धावा काढून झाला बाद

16:40 (IST)08 Dec 2020
कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, भारताची झुंज सुरुच

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत विराटची अर्धशतकी खेळी, ऑस्ट्रेलियात ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण

16:27 (IST)08 Dec 2020
भारताची जमलेली जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश

शिखर धवन फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी, सम्सने घेतला झेल

२८ धावांची खेळी करुन शिखर धवन माघारी

16:20 (IST)08 Dec 2020
लोकेश राहुलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

तब्बल ४ वर्षांनी लोकेश राहुल टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदा अपयशी ठरला, जाणून घ्या सविस्तर...

16:17 (IST)08 Dec 2020
विराट कोहली - शिखर धवन जोडीने सावरला भारताचा डाव

लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराटची शिखरला उत्तम साथ. स्टिव्ह स्मिथने दिलेल्या जीवदानाचा फायदा घेत विराटची फटकेबाजी, भारताला ओलांडून दिला ५० धावांचा टप्पा. दुसऱ्या विकेटसाठी शिखर धवनसोबत अर्धशतकी भागीदारी

15:51 (IST)08 Dec 2020
भारतीय संघाची खराब सुरुवात

लोकेश राहुल ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्या षटकात माघारी, आखुड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेवर तैनात असलेल्या स्मिथने घेतला सोपा झेल. भोपळा ही न फोडता राहुल माघारी

15:31 (IST)08 Dec 2020
ऑस्ट्रेलियाची १८६ धावांपर्यंत मजल

भारताला अंतिम सामन्यात विजयासाठी १८७ धावांचं आव्हान, भारतीय फलंदाजांना करावी लागणार मेहनत

15:29 (IST)08 Dec 2020
ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

डार्सी शॉर्ट चोरटी धाव घेताना माघारी परतला

15:23 (IST)08 Dec 2020
अखेरच्या षटकांत ग्लेन मॅक्सवेल माघारी परतला

टी. नटराजनने उडवला त्रिफळा, ३६ चेंडूत ५४ धावा करत मॅक्सवेल माघारी

15:23 (IST)08 Dec 2020
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेडकडून सर्वोच्च धावसंख्येची नोंद
15:21 (IST)08 Dec 2020
वेड - मॅक्सवेल जोडी फोडण्यात भारताला यश

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेड पायचीत, ८० धावा करुन वेड बाद

अर्धशतकी खेळीत वेडचे ७ चौकार आणि २ षटकार

15:17 (IST)08 Dec 2020
ग्लेन मॅक्सवेलचं अर्धशतक

भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करच मॅक्सवेलची चौफेर फटकेबाजी....गलथान क्षेत्ररक्षण करत भारतीय खेळाडूंचीही मॅक्सवेलला मदत

भारतीय क्षेत्ररक्षकांच्या निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच

15:03 (IST)08 Dec 2020
मिळालेल्या जिवदानाचा फायदा घेत मॅक्सवेल-वेड जोडीची फटकेबाजी

भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत सिडनीच्या मैदानावर कांगारुंची फटकेबाजी, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. वेडचा आक्रमक पवित्रा कायम

14:50 (IST)08 Dec 2020
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलला जीवदान

उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात ग्लेन मॅक्सवेल लोकेश राहुलकडे झेल देत माघारी. परंतू तिसऱ्या पंचांच्या पाहणीत चहलने टाकलेला चेंडू नो-बॉल असल्याचं निष्पन्न

14:38 (IST)08 Dec 2020
यष्टीरक्षक मॅथ्यू वेडचं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक

भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता ठेवण्याचं महत्वाचं काम वेडने केलं

14:30 (IST)08 Dec 2020
वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली

स्टिव्ह स्मिथ त्रिफळाचीत, रुम घेऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात सुंदरने टाकलेला बॉल स्टम्पवर, २४ धावांची खेळी करत स्मिथ बाद

दुसऱ्या विकेटसाठी स्मिथ आणि वेडची ५५ धावांची भागीदारी

14:14 (IST)08 Dec 2020
मॅथ्यू वेड - स्टिव्ह स्मिथ जोडीने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव

कर्णधार फिंच माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. वेडची आक्रमक पवित्रा आजमावत मैदानात फटकेबाजी. ऑस्ट्रेलियाने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

13:56 (IST)08 Dec 2020
विराटच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला माहिती आहे का??
13:50 (IST)08 Dec 2020
ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, कर्णधार फिंच माघारी

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा फिंचचा प्रयत्न फसला. बॅकफूटला येऊन मोठा फटका खेळताना फिंचने मारलेला फटका हार्दिक पांड्याच्या हातात. भोपळाही न फोडता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार माघारी.

13:22 (IST)08 Dec 2020
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचचं पुनरागमन

जाणून घ्या कसा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ

13:21 (IST)08 Dec 2020
अखेरच्या टी-२० सामन्यासाठीही भारतीय संघात कोणते बदल नाहीत
13:21 (IST)08 Dec 2020
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली

व्हाईटवॉशच्या उद्देशाने मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Next Stories
1 हार्दिक पांड्याला शोएब अख्तरचा सल्ला, म्हणाला …
2 पांड्याला नवा धोनी म्हणता येईल का?
3 Miss You Dhoni चं पोस्टर पाहून सिडनीच्या मैदानात विराटने असं काही केलं की…
Just Now!
X