भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला. आजच्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया बिनबाद २४ धावा करण्यात यशस्वी ठरली. आज दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (२७) बाद झाला. दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरिसदेखील बाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. पाठोपाठ शॉन मार्श ८ धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात मिळालेला लॅबसचेंज ३८ धावा करून माघारी परतला. नंतर ट्रेव्हिस हेड २० धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (५) तंबूत परतला. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी घेतले. सध्या हँड्सकॉम्ब २८ आणि कमिन्स २५ धावांवर नाबाद आहे.

त्याआधी पहिल्या दिवशी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली होती. पण भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. संघात पुन्हा संधी मिळालेल्या लोकेश राहुलला अवघ्या ९ धावाच करता आल्या. जॉश हेजलवूडने त्याला माघारी पाठवले. नवोदित मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सावरला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ६९ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात मयंक ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून झेलबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी त्याने पुजारासोबत ११६ धावांची भागीदारी रचली. चेतेश्वर पुजाराने कर्णधार विराट कोहलीला हाताशी घेत डाव पुढे नेला. पुजाराने अर्धशतक पूर्ण करत चहापानापर्यंत भारताला २ गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली. शेवटच्या सत्रात आधी कर्णधार कोहली २३ धावांवर आणि काही कालावधीने उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०३ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. दुसऱ्या सत्रात पहिल्या सत्रात नॅथन लॉयनने विहारीचा बळी टिपला. त्याने ४२ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत दीडशतक लगावले, पण द्विशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो १९३ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने नाबाद १५९ धावा केल्या. अखेर जाडेजा ८२ धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला.

Live Blog

11:40 (IST)05 Jan 2019
अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ रद्द; ऑस्ट्रेलिया ६ बाद २३६

चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला. आजच्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. 

11:06 (IST)05 Jan 2019
अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थांबवला

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. सध्या अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली आहे.

10:10 (IST)05 Jan 2019
चहापानाच्या सत्रानंतर पहिल्या षटकात भारताला यश

चहापानानंतरही ऑस्ट्रेलियाची घसरण सुरूच आसल्याचे दिसत आहे. पहिल्या षटकात भारताच्या कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार टीम पेन माघारी गेला आहे.

09:45 (IST)05 Jan 2019
चहापानपर्यंत ऑस्ट्रेलिया १९८/५

पहिल्या सत्रात दमदार झुंज देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या सत्रात कोलमडला. भारताने चार बळी टिपत सामन्यात दमदार पुनरागमन केले.

09:36 (IST)05 Jan 2019
ट्रॅविस हेड माघारी, कांगारुंचा निम्मा संघ तंबुत परतला

कुलदीप यादवने आपल्याच गोलंदाजीवर घेतला हेडचा सुरेख झेल

08:33 (IST)05 Jan 2019
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, लबुशेन माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने घेतला सुरेख झेल

08:22 (IST)05 Jan 2019
शॉन मार्श पुन्हा अपयशी, कांगारुंचा तिसरा फलंदाज माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने घेतला मार्शचा झेल

08:21 (IST)05 Jan 2019
ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फुटली, मार्कस हॅरिस माघारी

रविंद्र जाडेजाने घेतला हॅरिसचा बळी

07:21 (IST)05 Jan 2019
ऑस्ट्रेलियाचं चोख प्रत्युत्तर, हॅरिसची अर्धशतकी खेळी

उपहारापर्यंत ऑस्ट्रेलिया १२२/१

05:51 (IST)05 Jan 2019
अखेर ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फुटली, उस्मान ख्वाजा माघारी

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने घेतला झेल. पहिल्या विकेटसाठी कांगारुंची ७२ धावांची भागीदारी

05:36 (IST)05 Jan 2019
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांकडून सावध सुरुवात

उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला आहे