कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली आहे. वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) नाबाद आहेत. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

भारतीय कर्णधार विराट कोहलीनं नाणेफक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्य धावसंखेवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मयांक अग्रवालही (१७) तंबूत परतला होता. भारतीय संघाला लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर अनुभवी पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. मात्र, नॅथन लॉयन यानं पुजाराला बाद करत जोडी फोडली. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली.

पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या रहाणेसोबत कोहलीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. कोहलीनं ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान कोहलीनं ८ चौकार लगावलं. कोहली बाद झाल्यानंतर रहाणेही लगेच तंबूत परतला. त्यानंतर हनुमा विहारीनं (१६) आपली विकेट फेकली. पहिल्या दिवशी सामन्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजचं वर्चस्व दिसून आलं. स्टार्क, हेजलवडू, कमिन्स आणि लॉयन यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. कांगारुंच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघातील फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कनं दोन बळी घेतले तर हेजलवूड, कमिन्स आणि लॉयन यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.