भारताच्या दुबळ्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट करीत कर्णधार मायकेल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथ यांनी शानदार शतकांची अदाकारी पेश केली. दुखापतीवर मात करीत क्लार्कने आपल्या कसोटी कारकीर्दीतील २८वे शतक साजरे केले, तर स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम शतकी खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७ बाद ५१७ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस k01मात्र पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळे वाया गेला.
क्लार्कला मंगळवारी पाठीचे दुखणे वाढल्यामुळे नाइलाजास्तव मैदान सोडावे लागले होते. परंतु बुधवारी तो आपली अपूर्ण खेळी पूर्ण करण्याच्या इराद्याने आत्मविश्वासाने परतला. त्याने स्मिथच्या साथीने ऑस्ट्रेलिया संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले आहे.
दुसरा दिवस भारतासाठी निराशाजनक होता. कारण ऑस्ट्रेलियाने गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांची सहजगत्या धुलाई केली. दिवसाच्या अखेरच्या षटकात पदार्पणवीर कर्ण शर्माने क्लार्कचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. एवढीच गोष्ट भारतासाठी दिलासादायी ठरली. क्लार्कने १६३ चेंडूंत १८ चौकारांसह १२८ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजीत दिशा व टप्पा यांचा कमालीचा अभाव जाणवत होता. लय बिघडलेल्या गोलंदाजांवरील नाराजी कर्णधार विराट कोहलीलासुद्धा लपवता आली नाही. पाठीच्या दुखापतीवर मात करीत क्लार्कसुद्धा आपली शतकी खेळी उभारू शकला. दुसरीकडे स्मिथने आपले सातत्य कायम राखताना कसोटीमधील पाचवे शतक पूर्ण केले. अंधूक प्रकाश आणि पावसाचा व्यत्यय यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला k04तेव्हा स्मिथ १६२ धावांवर खेळत होता. २३१ चेंडूंत उभारलेल्या या खेळीत २१ चौकारांचा समावेश होता. दिवसभरात मुसळधार पावसाच्या वर्षांवामुळे तीनदा खेळ थांबवण्यात आला आणि फक्त ३० षटकांचा खेळ होऊ शकला, जर जवळपास चार तासांचा खेळ वाया गेला.
फिलिप ह्युजच्या मृत्यूची भावनिकता दुसऱ्या दिवशीसुद्धा जाणवत होती. क्लार्क आणि स्मिथ या दोघांनीही शतके झळकावल्यावर आभाळाकडे पाहून आपल्या लाडक्या सहकाऱ्याला मानवंदना दिली.
पहिल्या दिवशी अखेरच्या काही षटकांत भारतीय गोलंदाजांनी तीन बळी घेत सामन्यात पुनरागमन केले होते. परंतु दुसऱ्या दिवसावर क्लार्क आणि स्मिथ यांनी सातव्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी करून वर्चस्व गाजवले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धवन गो. इशांत ९, डेव्हिड वॉर्नर झे. इशांत गो. कर्ण शर्मा १४५, शेन वॉटसन झे. धवन गो. आरोन १४, मायकेल क्लार्क झे. पुजारा गो. कर्ण शर्मा १२८, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे १६२, मिचेल मार्श झे. कोहली गो. आरोन ४१, नॅथन लिऑन त्रिफळा गो. शमी ३, ब्रॅड हॅडिन झे. साहा गो. शमी ०, मिचेल जॉन्सन खेळत आहे ०, अवांतर (लेगबाइज ४, वाइड ९, नोबॉल २) १५, एकूण : १२० षटकांत ७ बाद ५१७
बाद क्रम : १-५०, २-८८, २-२०६*, ३-२५८, ४-३४५, ५-३५२, ६-३५४, ७-५१७
गोलंदाजी : मोहम्मद शमी २४-२-१२०-२, वरुण आरोन २३-१-१३६-२, इशांत शर्मा २७-५-८५-१, कर्ण शर्मा ३३-१-१४३-२, मुरली विजय १३-३-२९-०.

मायकेल क्लार्कने अविश्वसनीय धाडस दाखवले -स्मिथ
भावासमान असलेल्या फिल ह्य़ुजच्या मृत्यूनंतर स्वत:ला सावरत कर्णधार मायकेल क्लार्क मैदानावर उतरला. पाठीच्या वेदनांशी झुंज देत क्लार्कने दुसऱ्या दिवशी शतक झळकावून अविश्वसनीय धाडस दाखवले, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथने क्लार्कची स्तुती केली आहे.
‘‘खडतर परिस्थितीत क्लार्कने सुरेख खेळ केला. काही फटके खेळताना त्याला त्रास जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून आम्ही सर्वच जण मानसिक धक्क्याखाली वावरत आहोत. ह्य़ुजच्या कुटुंबीयांसोबत जवळपास संपूर्ण वेळ घालवल्यानंतर क्लार्कने जे धाडस दाखवले, त्याबाबत त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे,’’ असे स्मिथने सांगितले.
आपल्या नाबाद १६२ धावांच्या खेळीबद्दल तो म्हणाला, ‘‘यापूर्वी फलंदाजी करताना मी कधीच संयम दाखवला नाही. सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत असल्यामुळे मी अडचणीत सापडत होतो. पण मोठी खेळी साकारण्यासाठी संयम किती आवश्यक आहे, याचे महत्त्व मला पटले आहे. हे शतक माझ्यासाठी विशेष असून या मोसमात मी अधिक शतके झळकावेन, अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला असून आता गोलंदाजांना त्यांची कामगिरी चोखपणे पार पाडावी लागणार आहे.’’