इंग्लंडने दिलेल्या ३२३ धावांचा पाठलाग करताना लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुसरा वन-डे सामना इंग्लंडने ८६  धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेलं आव्हान भारतीय फलंदाजांना झेपलं नाही, त्यातच ठराविक अंतराने भारताच्या विकेट पडत गेल्यामुळे इंग्लंडला सामन्यात विजय मिळवणं शक्य झालं. भारताकडून सुरेश रैना आणि विराट कोहलीने चौथ्या विकेटसाठी केलेली ८० धावांची भागीदारी सर्वोत्तम ठरली. याव्यतिरीक्त एकही भारतीय फलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. धोनीने आंतरराष्ट्रीय वन-डे कारकिर्दीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला. मात्र सोबतीला कोणताही खंदा फलंदाज नसल्यामुळे त्यानेही धीमा खेळ करणं पसतं केलं. धोनी माघारी परतल्यानंतर भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तबच झालं.

इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करत भारतीय फलंदाजीला वेसण घातली. लियाम प्लंकेटने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर त्याला आदिल रशिद व डेव्हिड विलीने प्रत्येकी २ आणि मोईन अली, मार्क वूड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. या मालिकेतला अंतिम सामना मंगळवारी हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

त्याआधी जो रुटची शतकी खेळी आणि त्याला कर्णधार इयॉन मॉर्गन आणि डेव्हिड विलीने दिलेली भक्कम साथ या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात इंग्लंडने ७ गडी गमावत ३२२  धावा केल्या. जो रुटने या सामन्यात नाबाद ११३  धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने आपल्या डावाची सुरुवात अतिशय सावध पद्धतीने केली. मात्र चांगली सुरुवात केल्यानंतर सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय माघारी परतले.

यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही अतिशय संयमीपणे भारतीय गोलंदाजीचा सामना करत तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीच्या बळावरच इंग्लंडने सन्मानजनक धावसंख्या उभारली. कर्णधार मॉर्गननेही सामन्यात ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र मॉर्गन माघारी परतल्यानंतर मधल्या काळात इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा बॅकफूटला गेला. मात्र डेव्हिड विलीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत जो रुटला चांगली साथ दिली. या दोघांमध्ये झालेल्या अर्धशतकी भागीदारीवर इंग्लंडने यशस्वीरित्या ३०० धावांचा टप्पा पार केला. दरम्यान अखेरच्या षटकात डेव्हिड विलीने झटपट धावा घेण्याचा सपाटा लावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अखेरच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात विली धोनीच्या अचून फेकीवर धावबाद झाला

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधीक ३, तर उमेश यादव, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

 

Live Blog

23:26 (IST)14 Jul 2018
अखेरच्या चेंडूवर युझवेंद्र चलह माघारी, भारताचा डाव २३६ धावांत आटोपला

डेव्हिड विलीच्या अखेरच्या चेंडूवर युझवेंद्र चहल माघारी. भारताचा डाव संपुष्टात इंग्लंड ८६ धावांनी विजयी. ३ सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड १-१ ने बरोबरीत

23:09 (IST)14 Jul 2018
भारताला नववा धक्का, सिद्धार्थ कोल माघारी

प्लंकेटच्याच षटकात सिद्धार्थ कौल माघारी, भारताचा नववा गडी माघारी

23:07 (IST)14 Jul 2018
अखेर धोनी माघारी, भारताला आठवा धक्का

अखेर धोनीला बाद करण्यात इंग्लंडला यश, ३७ धावांची खेळी करुन प्लंकेटच्या गोलंदाजीवर धोनी माघारी

22:51 (IST)14 Jul 2018
धोनीच्या वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण

आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा धोनी चौथा भारतीय तर क्रिकेटविश्वातला १२ वा फलंदाज ठरला आहे.

22:33 (IST)14 Jul 2018
भारताला सातवा धक्का, उमेश यादव यष्टीचीत

आदिल रशिदच्या गोलंदाजीवर उमेश यादव भोपळाही न फोडता माघारी. भारताला सातवा धक्का

22:32 (IST)14 Jul 2018
धोनी-पांड्याची छोटेखानी भागीदारी, मात्र प्लंकेटच्या गोलंदाजीवर पांड्या माघारी

हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने पाचव्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र प्लंकेटच्या गोलंदाजीवर बटलरकडे झेल देत पांड्या माघारी. भारताचा सहावा गडी तंबूत परतला

22:01 (IST)14 Jul 2018
भारताला पाचवा धक्का, सुरेश रैना त्रिफळाचीत

विराट कोहली माघारी परतल्यानंतर भारताचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला दिसतो आहे. मैदानावर स्थिरावलेला सुरेश रैना आदिल रशिदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आहे.

21:48 (IST)14 Jul 2018
भारताची जमलेली जोडी फुटली, विराट कोहली माघारी

अखेर भारताची जमलेली जोडी फोडण्यात इंग्लंडला यश. मोईन अलीच्या गोलंदाजीवर विराट कोहली ४५ धावांवर पायचीत होऊन माघारी. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी

21:47 (IST)14 Jul 2018
कोहली - रैना जोडीने भारताचा डाव सावरला

पहिले ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर कोहली - रैना जोडीने भारताचा डाव सावरला आहे. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. या भागीदारीमुळे भारताने १०० धावांचा पल्ला ओलांडला आहे. 

20:38 (IST)14 Jul 2018
भारताला तिसरा धक्का, लोकेश राहुल भोपळा ही न फोडता माघारी

सलामीवीर माघारी परतल्यानंतर भारताच्या लोकेश राहुलने साफ निराशा केली आहे. प्लंकेटच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बटलरकडे झेल देत राहुल माघारी

20:34 (IST)14 Jul 2018
शिखर धवन बाद, भारताचे सलामीवीर माघारी

रोहित माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने शिखर धवन डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर माघारी.

20:28 (IST)14 Jul 2018
सावध सुरुवातीनंतर भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी डावाची सावध रितीने सुरुवात केली. रोहित शर्मा - शिखर धवन ही जोडी मोठी भागीदारी रचणार असं वाटत असतानाच रोहित शर्मा मार्क वूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आहे.

19:20 (IST)14 Jul 2018
अखेरच्या षटकांमध्ये विलीची फटकेबाजी, इंग्लंडची ५० षटकात ३२२ धावांपर्यंत मजल

जो रुटला साथ देत डेव्हिड विलीने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करत इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने ३२२ धावांपर्यंत मजल मारली असून भारताला हा सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. दरम्यान डेव्हिड विलीनेही आपलं अर्धशतक साजरं केलं

19:04 (IST)14 Jul 2018
जो रुटचं शतक, डेव्हिड विली सोबत सावरला संघाचा डाव

इंग्लंडच्या जो रुटने भारतीय गोलंदाजीचा सामना करत दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. डेव्हिड विलीसोबत अर्धशतकी भागीदारी करुन रुटने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली आहे.

18:39 (IST)14 Jul 2018
इंग्लंडला सहावा धक्का, मोईन अली बाद

मोईन अली आणि जो रुटमध्ये छोटेखानी भागीदारी. मात्र चहलच्या गोलंदाजीवर मोईन अली बाद

18:14 (IST)14 Jul 2018
इंग्लंडला पाचवा धक्का, जोस बटलर माघारी

उमेश यादवच्या गोलंदाजीवर जोस बटलर धोनीकडे झेल देऊन माघारी. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडच्या मधल्या फळीकडून निराशा

18:01 (IST)14 Jul 2018
इंग्लंडचा चौथा धक्का, बेन स्टोक्स माघारी

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत स्टोक्स बाद. इंग्लंडचा चौथा गडी माघारी परतला. २०० ची धावसंख्या इंग्लंडकडून पार

17:45 (IST)14 Jul 2018
भारताच्या मदतीसाठी पुन्हा एकदा कुलदीप धावला

अर्धशतक झाल्यानंतर कर्णधार मॉर्गन कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी. इंग्लंडचा तिसरा गडी तंबूत परतला. कर्णधार मॉर्गनची ५१ चेंडूत ५३ धावांची खेळी

17:44 (IST)14 Jul 2018
इयॉन मॉर्गन - जो रुट जोडीने इंग्लंडचा डाव सावरला

सलामीवीर माघारी परतल्यानंतर मॉर्गन-रुट जोडीने इंग्लंडच्या डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. दोघांनीही संयमीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. भारताच्या जलदगती गोलंदाजावर आक्रमण करत आणि फिरकीपटूंना संयमाने खेळून काढत दोन्ही खेळाडूंनी आपापली अर्धशतकं पूर्ण केली. रुट आणि मॉर्गन यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.

16:40 (IST)14 Jul 2018
इंग्लंडला दुसरा धक्का, जेसन रॉय माघारी

कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा अडकताना दिसतोय. बेअरस्टोला माघारी धाडल्यानंतर कुलदीपने दुसरा सलामीवीर जेसन रॉयचाही अडथळा दूर केला आहे.

16:22 (IST)14 Jul 2018
इंग्लंडला पहिला धक्का, जॉनी बेअरस्टो माघारी

कुलदीप यादवने इंग्लंडची जमलेली जोडी फोडली. स्विपचा फटका खेळण्याच्या नादात कुलदीपच्या गोलंदाजीवर बेअरस्टो त्रिफळाचीत

16:17 (IST)14 Jul 2018
इंग्लंडची सावध सुरुवात

जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय या सलामीवीरांनी इंग्लंडला सावध सुरुवात करुन दिली आहे. योग्य चेंडूवर आक्रमक फटके आणि कठीण चेंडू शांतपणे खेळत काढून दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडची धावसंख्या ५० पार नेली आहे. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली असून या जोडीवर इंग्लंडच्या डावाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

15:08 (IST)14 Jul 2018
इंग्लंडने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

नाणेफेकीनंतर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आजच्या सामन्यात आपल्या संघामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीयेत.