मधल्या फळीत अॅलेक्स हेल्सने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर, इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतावर ५ गडी राखून मात करत इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेत रंगत निर्माण केली आहे. अॅलेक्स हेल्सने आजच्या सामन्यात ४१ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. हेल्सला कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्ट्रोने चांगली साथ दिली. इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही.

उमेश यादवने जेसन रॉय आणि जोस बटलर यांना माघारी धाडत इंग्लंडला मोठे धक्के दिले. यानंतर जो रुटही युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. मात्र यानंतर अॅलेक्स हेल्सने इतर फलंदाजांना हाताशी घेऊन इंग्लंडच्या डावाला आकार दिला. अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र हेल्सने भुवनेश्वर कुमारच्या अखेरच्या षटकात फटकेबाजी करत संघाच्या विजयावर सहजरित्या शिक्कामोर्तब केलं. भारताकडून उमेश यादवने २, युझवेंद्र चहल-भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १४८ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. भारताचे सलामीचे ३ फलंदाज हे अवघ्या २२ धावांमध्ये माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची अर्धशतकी भागीदारी रचत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच, आदिल रशिदच्या गोलंदाजीवर रैना यष्टीचीत होऊन माघारी परतला. यादरम्यान भारताची धावसंख्या १२.२ षटकात ७९ इतकी होती. मात्र यानंतर कोहली आणि धोनीने आक्रमक पवित्रा घेत मैदानात फटकेबाजीला सुरुवात केली. या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरच्या षटकांमध्ये धावा खोऱ्याने ओढल्या. विराट कोहलीला आजच्या सामन्यात अर्धशतक करण्याची संधी होती, मात्र अवघ्या ३ धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. यानंतर धोनी-पांड्या जोडीने फटकेबाजी करत भारताला १४८ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

इंग्लंडकडून डेव्हिड विली, जेक बॉल, लियाम प्लंकेट आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्यामुळे आता अखेरच्या सामन्यात कोणता संघ जिंकून मालिका जिंकतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • ५ गडी राखून इंग्लंडची भारतावर मात, मालिकेत १-१ ने बरोबरी
  • हेल्सने डेव्हिड विलीच्या साथीने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
  • अखेर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बेअरस्ट्रो माघारी, इंग्लंडचा निम्मा संघ बाद
  • अॅलेक्स हेल्स-जॉनी बेअरस्ट्रोच्या भागीदारीमुळे सामन्यात रंगत, दोघांमध्येही ३४ धावांची भागीदारी
  • इंग्लंडचा चौथा गडी माघारी
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर कर्णधार मॉर्गन माघारी, इंग्लंडची जमलेली जोडी फुटली
  • दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी
  • कर्णधार इयॉन मॉर्गन आणि अॅलेक्स हेल्सने इंग्लंडचा डाव सावरला
  • ठराविक अंतराने जो रुट चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, इंग्लंडला तिसरा धक्का
  • इंग्लंडला दुसरा धक्का, बटलर माघारी
  • मात्र त्याच षटकातील पुढच्या चेंडूवर विराटने बटलरचा झेल पकडत आपल्या चुकीची भरपाई केली
  • उमेश यादवच्या गोलंदाजीवर कोहलीने सोडला बटलरचा झेल
  • उमेश यादवने उडवला जेसन रॉयचा त्रिफळा, इंग्लंडला पहिला धक्का
  • जेसन रॉय आणि जोस बटलर जोडीकडून इंग्लंडच्या डावाची सावध सुरुवात
  • इंग्लंडला विजयासाठी १४९ धावांची गरज
  • धोनी-पांड्याची फटकेबाजी, २० षटकांत भारताची १४८ धावांपर्यंत मजल
  • भारताचा निम्मा संघ माघारी
  • विराट कोहलीच्या ४७ धावा, ३ धावांनी हुकलं कोहलीचं अर्धशतक
  • मात्र डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर कोहली माघारी
  • कोहली-धोनी जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • आदिल रशिदच्या गोलंदाजीवर सुरेश रैना यष्टीचीत, भारताचा चौथा गडी माघारी
  • रैना-कोहलीच्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला
  • विराट कोहली – सुरेश रैनामध्ये चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची अर्धशतकी भागीदारी
  • भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • प्लंकेटने उडवला लोकेश राहुलचा त्रिफळा, भारताला तिसरा धक्का
  • चोरटी धाव घेताना जेसन रॉयच्या फेकीवर धवन बाद, भारताला दुसरा धक्का
  • ठराविक अंतराने भारताला दुसरा धक्का, शिखर धवन माघारी
  • जेक बॉलच्या गोलंदाजीवर बटलरकडे झेल देत रोहित शर्मा माघारी, भारताला पहिला धक्का
  • भारताची अडखळती सुरुवात, सलामीवीर रोहित शर्मा माघारी
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय