कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेलं २५७ धावांचं आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केलं. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. भारताने कमी धावसंख्येचं आव्हान दिल्यामुळे दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी न करता भागीदारी रचण्याकडे भर दिला. या भागीदारीच्या जोरावर दोन्ही फलंदाजांनी भारताला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १८६  धावांची भागीदारी केली.

इंग्लंडची ही जमलेली जोडी फोडण्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रयत्न केला, मात्र त्याला यात यश लाभलं नाही.  भारताच्या प्रत्येक गोलंदाजांना इंग्लंडचे फलंदाजांनी संयमाने खेळून काढलं. जो रुटने सामन्यात नाबाद १०० तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूरला सामन्यात एकमेव बळी मिळाला.

तत्पूर्वी  मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा संकटात सापडला. हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने ५० षटकांत ८ गडी गमावत २५६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र शिखर धवन माघारी परतल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. दुसऱ्या सामन्यात संथ खेळीमुळे टीकेचा धनी बनलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही. अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने फटकेबाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांला मार्क वूडने १ बळी घेत चांगली साथ दिली. याआधी झालेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली होती. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Live Blog

00:10 (IST)18 Jul 2018
जो रुट - इयॉन मॉर्गनची अभेद्य भागीरादारी, इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब

भारतीय गोलंदाजीला पुरते उरुन रुट-मॉर्गन जोडीची नाबाद   धावांची शतकी भागीदारी. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब. इंग्लंडने मालिका २-१ ने जिंकली. सलग दुसऱ्या सामन्यात जो रुटचं शतक.

23:03 (IST)17 Jul 2018
कर्णधार इयॉन मॉर्गनचंही अर्धशतक, इंग्लंडची विजयाच्या दिशेने वाटचाल

जो रुटपाठोपाठ इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनचंही अर्धशतक. इंग्लंडची विजयाच्या दिशेने वाटचाल. दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी.

22:51 (IST)17 Jul 2018
जो रुटचं अर्धशतक, इंग्लंडचा डाव सावरला

जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांच्यात अर्धशतकी भागीदारी. इंग्लंडचा डाव सावरला. भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना करत जो रुटचं अर्धशतक

21:58 (IST)17 Jul 2018
इंग्लंडला दुसरा धक्का, जेम्स विन्स माघारी


ठराविक अंतराने इंग्लंडच्या दुसऱ्या फलंदाजाला माघारी धाडण्यात भारताला यश. जेम्स विन्स धावचीत होऊन माघारी परतला.

21:37 (IST)17 Jul 2018
इंग्लंडला पहिला धक्का, जॉनी बेअरस्टो माघारी

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बेअरस्टो रैनाकडे झेल देत माघारी. इंग्लंडचा पहिला गडी माघारी

21:36 (IST)17 Jul 2018
इंग्लंडच्या जोडीची आक्रमक सुरुवात

जेम्स विन्स आणि जॉनी बेअरस्टो जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात. बेअरस्टोची मैदानात चौफेर फटकेबाजी

20:33 (IST)17 Jul 2018
५० षटकात भारताची २५६ धावांपर्यंत मजल

इंग्लंडला विजयासाठी २५७  धावांचं आव्हान, डेव्हिड विलीच्या शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमार बाद

20:30 (IST)17 Jul 2018
शार्दुल ठाकूरची फटकेबाजी

अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरची फटकेबाजी. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर लगावले षटकार, भारताने ओलांडला २५० धावांचा टप्पा

20:14 (IST)17 Jul 2018
भारताला सातवा धक्का, धोनी माघारी

अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर कुमारच्या साथीने धोनीचा धावगती वाढवण्याचा प्रयत्न. मात्र डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर धोनी माघारी.

19:49 (IST)17 Jul 2018
हार्दिक-धोनीमध्ये छोटेखानी भागीदारी, मात्र मार्क वुडच्या गोलंदाजीवर हार्दिक बाद

भारतीय संघाची घसरगुंडी सुरुच. हार्दिक पांड्या मार्क वुडच्या गोलंदाजीवर जोस बटलरकडे झेल देत माघारी

19:11 (IST)17 Jul 2018
भारताचा निम्मा संघ माघारी, सुरेश रैना बाद

आदिल रशिदच्या गोलंदाजीवर जो रुटने झेल पकडत भारताला पाचवा धक्का दिला आहे. दुसऱ्या सामन्याप्रमाणेच भारताची फलंदाजी संकटात. धोनी-हार्दिक पांड्या जोडीवर भारताची मदार

19:04 (IST)17 Jul 2018
विराट कोहली त्रिफळाचीत, भारताला चौथा धक्का

विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात छोटेखानी भागीदारी. मात्र आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विराट कोहली माघारी. भारताचा चौथा गडी माघारी. विराट कोहलीच्या ७२ चेंडूत ७१ धावा. 

18:49 (IST)17 Jul 2018
भारताला तिसरा धक्का, दिनेश कार्तिक त्रिफळाचीत

आदिल रशिदच्या गोलंदाजीवर कार्तिक त्रिफळाचीत, भारताचा तिसरा गडी माघारी. भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा

18:47 (IST)17 Jul 2018
विराट कोहलीचं अर्धशतक

इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वीपणे समाचार घेत विराट कोहलीने अर्धशतक झळकावलं आहे

18:19 (IST)17 Jul 2018
भारताला दुसरा धक्का, 'गब्बर' धावबाद

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवन धावबाद. धवनच्या ४९ चेंडूत ४४ धावा.

18:18 (IST)17 Jul 2018
धवन-कोहली जोडीने संघाचा डाव सावरला

शिखर धवन आणि विराट कोहली जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी.

17:25 (IST)17 Jul 2018
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

भारतीय सलामीवीरांकडून डावाची अडखळती सुरुवात. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मार्क वूडकडे झेल देत रोहित माघारी.

16:54 (IST)17 Jul 2018
भारतीय संघातही दोन महत्वाचे बदल

निर्णायक सामन्यासाठी भारतानेही आपल्या संघात दोन बदल केले आहेत. लोकेश राहुल आणि सिद्धार्थ कौलला विश्रांती देऊन दिनेश कार्तिक आणि शार्दुल ठाकूरला संघात जागा देण्यात आलेली आहे.

16:53 (IST)17 Jul 2018
निर्णायक सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

हेडिंग्लेच्या मैदानात खेलवल्या जाणाऱ्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी सलामीवीर जेसन रॉयला विश्रांती देऊन जेम्स विन्स या खेळाडूला इंग्लंडच्या संघात जागा देण्यात आली आहे.