बर्मिंगहॅम कसोटीपाठोपाठ भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीतही पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने १ डाव आणि १५९ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. लॉर्ड्स कसोटीत भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांपुढे अक्षरशः लोटांगण घातलं. दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाजांनी पटापट विकेट फेकल्यामुळे भारत या सामन्यात आपलं आव्हान तयारच करु शकला नाही. यादरम्यान दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने अंतिम ११ मध्ये केलेले बदल चांगलेच चर्चेत आले होते.

शिखर धवनला वगळण्याच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. याचसोबत खुद्द कर्णधार विराट कोहलीनेही उमेश यादवला संघातून वगळण्याचा निर्णय चुकल्याचं मान्य केलं. यामुळे तिसऱ्या कसोटीत जर भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जायचं नसेल तर संघामध्ये ४ महत्वाचे बदल करणं गरजेचं आहे.

पहिला बदल – मुरली विजय ऐवजी शिखरला संघात स्थान

सलामीवीर या नात्याने मुरली विजयने या कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी केली आहे. आतापर्यंत ४ डावांमध्ये विजयने अवघ्या २६ धावा केल्या आहेत. इंग्लिश हवामानात वळणाऱ्या चेंडूंवर मुरली विजयची पुरती भंबेरी उडेली होती. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी विजय ऐवजी शिखर धवनला संघात जागा मिळणं गरजेचं आहे. शिखर धवनची परदेशातील कसोटी सामन्यांमधली कामगिरी फारशी चांगली नाही. मात्र एक आक्रमक फलंदाज या नात्याने तो भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतो.

दुसरा बदल – हार्दिक पांड्या ऐवजी करुण नायरला संघात स्थान

भारतीय संघात गोलंदाजीसाठी अतिरीक्त पर्याय म्हणून हार्दिक पांड्याची संघात निवड करण्यात आली होती. यासाठी संघ प्रशासनाने रविंद्र जाडेजालाही विश्रांती दिली. मात्र ज्या कामगिरीसाठी हार्दिकची संघात निवड करण्यात आली होती, तशा प्रकारची कामगिरी हार्दिकला करणं जमलेलं नाहीये. पहिल्या कसोटीत हार्दिकला एकही बळी घेता आला नाही. मात्र दुसऱ्या कसोटीत हार्दिकने ३ बळी घेतले. याचसोबत हार्दिकच्या फलंदाजीतले कच्चे दुवेही या मालिकेत समोर आले आहेत. यामुळे फलंदाजीत मार खात असलेल्या भारतीय संघाला करुण नायर चांगला पर्याय ठरु शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये करुण नायरने स्थानिक आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे करुण नायर हार्दिक पांड्याच्या जागेवर चांगला पर्याय ठरु शकतो.

तिसरा बदल – कुलदीप ऐवजी बुमराह/उमेशला संघात स्थान

इंग्लंडचे फलंदाज फिरकी माऱ्यासमोर शरणागती पत्करतात हा इतिहास आहे. यासाठी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची संघात निवड करण्यात आली. लॉर्ड्स कसोटीत उमेश यादवला वगळून कुलदीपला संघात जागाही दिली. मात्र कुलदीप यादव गोलंदाजीच चमक दाखवू शकला नाही. भारतीय संघाने केलेला हा बदल त्यांना चांगलाच महागात पडला. जलदगती गोलंदाजांसाठी नंदनवन ठरत असलेल्या खेळपट्टीवर उमेश सारख्या गोलंदाजाला वगळून कुलदीपला स्थान देण्याचा निर्णय भारताच्या चांगलाच अंगलट आला. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी कुलदीप यादवच्या जागी जसप्रीत बुमराह किंवा उमेश यादवला संघात जागा देता येऊ शकते.

चौथा बदल – दिनेश कार्तिक ऐवजी ऋषभ पंतला संघात स्थान

रणजी करंडक स्पर्धेत केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर दिनेश कार्तिकला भारतीय कसोटी संघात जागा मिळाली. मात्र आतापर्यंत मिळालेल्या संधीचा फायदा उचलण्यात दिनेश कार्तिक पुरता अपयशी ठरला आहे. ४ डावांमध्ये दिनेश कार्तिक फक्त २१ धावा करु शकला आहे, ज्यामध्ये दोनवेळा त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. याव्यतिरीक्त यष्टीरक्षणातही दिनेश कार्तिकने निराशा केली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ऋषभ पंतला संघात जागा देण्याची ही योग्य वेळ आहे. ऋषभ पंतने भारत अ दौऱ्यात फलंदाजी आणि यष्टीरक्षणात आपली चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी संघात ऋषभला संघात जागा देता येऊ शकते.