लोकेश राहुलच्या नाबाद १०१ धावा आणि त्याला रोहित शर्मा-विराट कोहली या फलंदाजांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं १६० धावांचं आव्हान भारताने रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारताच्या डावाची सुरुवातही अडखळती झाली होती. मात्र त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरला. विशेषकरुन लोकेश राहुलने आक्रमक खेळी करुन इंग्लंडच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवलं. रोहित शर्माला फॉर्मात येण्यासाठी थोडासा अवधी लागला, मात्र तोपर्यंत लोकेश राहुलने सर्व कसर भरून काढली. रोहित माघारी परतल्यानंतर राहुलने विराटच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला. याव्यतिरीक्त अन्य सर्व गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. तत्पूर्वी कुलदीप यादवच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारु पाहणाऱ्या यजमान इंग्लंडला १५९ धावांवर रोखले. चायनामन कुलदीप यादवने घेतलेले ५ बळी हे पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. कुलदीपने इंग्लंडची मधळी फळी कापून काढत भारताला सामन्यात पुनरागमन करण्यास मदत केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय गोलंदाजांना पहिल्या षटकात जेसन रॉय – जोस बटलर जोडीच्या आक्रमक फटकेबाजीचा सामना करावा लागला. मात्र जेसन रॉयला उमेश यादवने आपल्या गोलंदाजीवर माघारी धाडलं. यानंतर इंग्लंडचा एकही फलंदाज कुलदीपच्या गोलंदाजीपुढे तग धरु शकला नाही.

जोस बटलरने एका बाजूने किल्ला लढवत आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र त्याला इतर फलंदाजांची हवीतशी साथ लाभली नाही. कुलदीपला उमेश यादवने २ आणि हार्दिक पांड्याने १ बळी घेत चांगली साथ दिली.

  • भारत मालिकेत १-० ने आघाडीवर
  • षटकार खेचत विराट कोहलीचं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब
  • लोकेश राहुलचं धडाकेबाज शतक, इंग्लंडच्या खेळाडूंनी जिंकण्याची आशा सोडली
  • विराट कोहली – लोकेश राहुलने संघाचा डाव सावरला
  • राहुल – रोहित शर्मामध्ये दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी
  • रोहित शर्मा आदिल रशिदच्या गोलंदाजीवर माघारी, कर्णधार मॉर्गनने पकडला झेल
  • अखेर भारताची जमलेली जोडी फोडण्यात इंग्लंडला यश
  • लोकेश राहुल-रोहित शर्माममध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • लोकेश राहुलचं अर्धशतक
  • रोहित शर्मानेही पकडला जम, इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांवर आक्रमण
  • लोकेश राहुलची फटकेबाजी, भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • लोकेश राहुल – रोहित शर्मा जोडीने भारताचा डाव सावरला
  • डेव्हिडी विलीकडून शिखर धवन त्रिफळाचीत
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची अडखळती सुरुवात
  • २० षटकात इंग्लंडची १५८ धावांपर्यंत मजल, भारताला १५९ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकात धावा जमवण्यात इंग्लंडचे फलंदाज यशस्वी
  • ख्रिस जॉर्डन उमेश यादवच्या गोलंदाजीवर माघारी, इंग्लंडला आठवा धक्का
  • कुलदीप यादवचे सामन्यात ५ बळी
  • कुलदीप यादवच्या अखेरच्या षटकात जोस बटलर माघारी, इंग्लंडला सातवा धक्का
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर मोईन अली बाद, इंग्लंडला सहावा धक्का
  • मोईन अली – जोस बटलर जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • इंग्लंडचा डाव कोलमडला, निम्मा संघ माघारी
  • जॉनी बेअरस्ट्रो आणि जो रुट लागोपाठ कुलदीपच्या गोलंदाजीवर यष्टीचीत
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने पकडला मॉर्गनचा झेल
  • भारताचं दमदार पुनरागमन, इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन माघारी
  • इंग्लंडची दुसरी जोडी फुटली, कुलदीप यादवने उडवला अॅलेक्स हेल्सचा  त्रिफळा
  • भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत २९ चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक
  • एका बाजून जोस बटलरने इंग्लंडच्या डावाचा किल्ला लढवणं सुरु ठेवलं
  • इंग्लंडची जोडी फोडण्यात भारताला यश, उमेश यादवच्या गोलंदाजीवर रॉय त्रिफळाचीत
  • इंग्लंडने ओलांडला ५० धावांचा टप्पा, रॉय-बटलर जोडीची फटकेबाजी
  • जेसन रॉय, जोस बटलर जोडीची आक्रमक सुरुवात
  • विराट कोहलीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय