ट्रेंट ब्रिज कसोटीत भारताने विजयासाठी दिलेलं ५२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ, काही चांगल्या भागीदाऱ्यांनंतर कोलमडला आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने ९ गड्यांच्या मोबदल्यात ३११ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारत या कसोटी सामन्यात विजयासाठी अवघं एक पाऊल दूर असून अखेरच्या दिवशी पहिल्याच सत्रात भारत विजयाला गवसणी घालेल. दुखापतीमधून सावरलेल्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. बुमराहने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला. दरम्यान चौथ्या दिवसाच्या खेळात तब्बल १२ विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे.

१ – एकाच कसोटी सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारी ऋषभ पंत-लोकेश राहुल ही पहिली जोडी ठरली आहे.

२ – गेल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये ५ विकेट घेण्याची जसप्रीत बुमराहची दुसरी वेळ ठरली आहे. बुमराहच्या आधी भारताच्या मोहम्मद निसार (१९३६) आणि मनोज प्रभाकर (१९८९) हा कारनामा केला होता.

३ – कसोटी क्रिकेटमध्ये एका देशात २ हजार धावा आणि २०० पेक्षा जास्त बळी अशी कामगिरी करणारा स्टुअर्ट ब्रॉड तिसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. याआधी सर इयान बोथम आणि कपिल देव यांनी ही कामगिरी करुन दाखवली आहे.

४ – एकाच कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी ५ किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. ऋषभ पंत-लोकेश राहुल जोडीने या कामगिरीसह किरण मोरे-मोहम्मद अझरुद्दीन, किरम मोरे-कृष्णमचारी श्रीकांत, सौरव गांगुली-शिवसुंदर दास या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

७ – चौथ्या दिवसाचा खेळ संपेपपर्यंत लोकेश राहुलने सामन्यात ७ झेल पकडले आहेत. इंग्लंडमध्ये एखाद्या खेळाडूने घेतलेले हे सर्वाधीक झेल ठरले आहेत.

७ – यष्टीरक्षक ऋषभ पंतने आतापर्यंत यष्टींमागे घेतलेले झेल. कसोटी पदार्पणात एखाद्या भारतीय यष्टीरक्षकाने घेतलेले हे सर्वाधिक झेल ठरले आहे.

९ – कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजारपेक्षा जास्त धावा आणि ३०० बळी घेणारा स्टुअर्ट ब्रॉड नववा खेळाडू ठरला आहे.

११ – इशांत शर्माने अॅलिस्टर कूकला बाद करण्याची ही अकरावी वेळ ठरली. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्कलने कुकला कसोटी क्रिकेटमध्ये १२ वेळा माघारी धाडलं आहे.

२१ – चौथ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत बुमराहच्या नावावर २१ बळींची नोंद झालेली आहे. ४ कसोटी सामने खेळल्यानंतर भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी वेंकटेश प्रसाद आणि मुनाफ पटेल यांनी ४ कसोटींनंतर १९ बळी घेतले होते.

१०६ – जोस बटलरने दुसऱ्या डावात काढलेल्या १०६ धावा या इंग्लंडच्या भारताविरुद्धच्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. २००७ साली ओव्हल कसोटीत केविन पिटरसनने दुसऱ्या डावात भारताविरुद्ध १०१ धावा केल्या होत्या.

१६६ – आतापर्यंत १६६ खेळाडूंनी इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये शतकं झळकावली आहेत. जोस बटलरचं शतक हे इंग्लंडच्या कसोटी इतिहासातलं ८५८ वं शतक ठरलं आहे.