इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात स्विकाराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यजमान संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघावर टीकेचं सत्र सुरु झालं आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने चौथ्या कसोटी सामन्यातील पराभवासाठी रविचंद्रन आश्विनला जबाबदार धरलं आहे. इंडिया टूडे वृत्तवाहिनीशी बोलत असताना हरभजनने आपलं मत मांडलं.

“साऊदम्टनची खेळपट्टी ही ऑफस्पिनर गोलंदाजांना मदत करणारी होती. ठरलेल्या टप्प्यावर जर चेंडू टाकला असता तर तुम्हाला सहज विकेट मिळत गेल्या असत्या. इंग्लंडच्या मोईन अलीनेही नेमकं हेच केलं. पहिल्यांदाच इंग्लंडचे फिरकीपटू भारतापेक्षा चांगली कामगिरी करताना मी पाहिले आहेत. रविचंद्रन आश्विन चौथ्या सामन्यात विकेट घेण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे ही मालिका आपण ३-१ ने गमावली आहे.” हरभजनने आश्विनच्या गोलंदाजीवर टीका केली. इंग्लंडच्या मोईन अलीने सामन्यात ९ विकेट घेतल्या, तर रविचंद्रन आश्विनला अवघ्या ३ विकेटवर समाधान मानावं लागलं.

रविचंद्रन आश्विनच्या दुखापतीविषयी मला माहिती नाही. मात्र त्याची दुखापत जर गंभीर होती, तर संघ व्यवस्थापनाने त्याबद्दल निर्णय घ्यायला हवा होता. मात्र आश्विनची दुखापत फारशी गंभीर नसेल तर त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणं गरजेचं होतं, जे त्याच्याकडून झालेलं दिसतं नाहीये. २०१४ सालापासून भारत आपल्या गोलंदाजीच्या समस्येवर कायमस्वरुपी समाधान शोधण्यासाठी अपयशी ठरल्याचंही हरभजन सिंहने बोलून दाखवलं.