तिसऱ्या कसोटी सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी संघात स्थान मिळालेल्या ऋषभ पंतने आपल्या कामगिरीने सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं आहे. कसोटी पदार्पणात इंग्लंडविरुद्ध ५ झेल घेणारा ऋषभ चौथा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. या कामगिरीसह पंतने नरेन ताम्हाणे, किरण मोरे, नमन ओझा या यष्टीरक्षकांच्या मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

पंतने ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर दुसऱ्या दिवसाच्या खेळात अॅलिस्टर कुक, केटन जेनिंग्ज, ओली पोप, ख्रिस वोक्स आणि आदिल रशिद या खेळाडूंचा यष्टीमागे झेल घेतला. दरम्यान पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये हार पत्करावी लागल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने चांगलं पुनरागमन केलं आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.