भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारताच्या गोलंदाजांना झुंजवले. त्यामुळे इंग्लंडकडे आता २३३ धावांची आघाडी आहे. काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ६ धावा केल्या होत्या. त्यापुढे खेळताना आज पहिल्या सत्रात अॅलिस्टर कूक, मोईन अली आणि कीटन जेनिंग्स हे तीन गडी इंग्लंडने गमावले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात उपहारानंतर लगेचच इंग्लंडला चौथा धक्का बसला. जॉनी बेअरस्टो शून्यावर त्रिफळाचीत झाला. कर्णधार जो रूटदेखील ४८ धावांवर धावचीत झाला. पण अखेर स्टोक्स-बटलर जोडीने डाव सावरला.

दरम्यान कालच्या सामन्यात काही विक्रमांचीही नोंद करण्यात आली.

११ – आतापर्यंत लोकेश राहुलने या कसोटी मालिकेत ११ झेल पकडले आहेत. भारताबाहेर एका कसोटी मालिकेत सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत लोकेश राहुल तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. राहुल द्रविड (१३ झेल, विरुद्ध ऑस्ट्रेलिया) आणि एकनाथ सोलकर (१२ झेल, विरुद्ध इंग्लंड १९७२-७३) हे खेळाडू राहुलच्या पुढे आहेत.

१६ – कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १६ डावांमध्ये इंग्लंडचा सलामीवीर केटन जेनिंग्जने एकही अर्धशतक झळकावलेलं नाहीये. इंग्लंडच्या इतिहासात सलामीपटूंकडून झालेल्या सर्वात खराब कामगिरीच्या निकषांमध्ये जेनिंग्जने माईक अॅथर्टन यांच्यासोबत बरोबरी केली आहे. मार्क बुचर आणि जॉन एड्रीच हे माजी खेळाडू जेनिंग्जच्या पुढे आहेत.

२२.६५ – गेल्या ११ कसोटी सामन्यांमधलं केटन जेनिंग्जने २२.६५ ची सरासरी नोंदवली आहे. कसोटीत सलामीवीरांमधलं ही सर्वात कमी सरासरी ठरली आहे. (आपल्या सलामीच्या कसोटीत शतक झळकावलेल्याच्या निकषावर)

३० – यष्टीरक्षक ऋषभ पंतने आतापर्यंत ३० धावा Byes स्वरुपात बहाल केल्या आहेत. भारतीय यष्टीरक्षकांमध्ये आतापर्यंत दिनेश कार्तिकने २००७ साली बंगळुरु कसोटीत पाकिस्तानविरुद्ध ४७ धावा Byes स्वरुपात दिल्या होत्या.

३७ – कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या ३७ डावामंध्ये इंग्लंडच्या सलामीवीरांना शतकी भागीदारी उभारता आलेली नाहीये. २०१६ साली भारताविरुद्ध चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या सलामीवीरांनी शेवटची शतकी भागीदारी केली होती.

२४२ – सॅम करनने आतापर्यंत मालिकेत २४२ धावा काढल्या आहेत. भारताविरुद्ध आठव्या किंवा त्याच्याखालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजांच्या यादीमध्ये करनची ही कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. याआधी २००९ साली न्यूझीलंडच्या डॅनिअल व्हिटोरीने २२० धावा केल्या होत्या.